breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

गणेश विसर्जनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शिवसेनेचा महापालिकेवर हल्लाबोल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेनेने आज (सोमवारी) पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौंद बंद केले. शहरात फिरत्या हौंदाची कोठेही व्यवस्था केली नाही, मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन, यामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. त्यावर आज संध्याकाळपर्यंत मुर्तीदानाबाबत प्रभागनिहाय पालिकेचे नियोजन व अधिकारी वर्गाच्या जबाबदार्‍या जाहीर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विश्वजित बारणे, सरिता साने, अजित तुतारे, संतोष सौंदणकर, बाळासाहेब वाल्हेकर, अभिजीत गोफण, हरेश नखाते, ज्ञानेश्वर शिंदे, शर्वरी जळमकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

गजानन चिंचवडे म्हणाले, कोरोनाचा काळ असतानाही पालिकेने गणेशोत्सवाचे नियोजन केले नाही. पालिका प्रशासनाकडून अतिशय गलथान कारभार सुरु आहे. पालिकेने विसर्जन घाट पत्रे लावून बंद केले आहेत. शहरात फिरत्या हौंदाची कोठेही व्यवस्था नाही. पालिकेने गणेशोत्सावकडे अक्षम्य पद्धतीने दुर्लक्ष केले. कसलेही नियोजन केले नाही. त्यामुळे दीड दीवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन तसेच स्वयंसेवी संस्था पालिकेसोबत जोडल्या असतील तर त्यांची प्रभागनिहाय माहिती प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांना देखील नाही. नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. पालिका गणेशभक्तांच्या भावनांशी खेळत आहे. शिवसेनेने दान घेतलेल्या मुर्त्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत मुर्तीदानबाबत पालिकेचे प्रभागनिहाय नियोजन व अधिकारी वर्गाच्या जबाबदार्‍या जाहीर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे चिंचवडे यांनी सांगितले.

पालिका प्रशासनाला केवळ निविदेत रस – खासदार बारणे

पिंपरी पालिकेने विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नाही. शेजारील पुणे पालिकेने विसर्जनासाठी फिरते हौद केले आहेत. मुर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. पण, पिंपरी पालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. पालिका प्रशासन केवळ निविदा प्रक्रियेत गुंतले आहे. राज्य सेवेतील अतिरिक्त, उपायुक्त, सहाय्यक दर्जाचे अधिकारी केवळ ‘मलिदा’ मिळतो यासाठी प्रतिनियुक्तीवर पालिकेत येतात. पालिकेच्या पैशांवर डोळा ठेवून चांगल्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग पाहिजे असते. त्यांना कामात अजिबात रस नाही. शहर विकास, धार्मिक कार्यक्रमांचे देखील नियोजन त्यांच्याकडून केले जात नाही. कोरोनाची परिस्थितीची जाणीव असतानाही या अधिका-यांनी कोणतेही नियोजन केले नाही. गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका प्रशासनावर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button