breaking-newsराष्ट्रिय

बारामती ते दिल्ली व्हाया मुंबई… जाणून घ्या शरद पवारांबद्दलच्या १२ खास गोष्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ७८ वा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या खास १२ गोष्टी…


>

पवारांचा जन्म डिसेंबर १२, १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.


>

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.


>

१९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

>
१८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (इंदिरा) २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

>
१९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता

>
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

>
नरसिंह रावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली. १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला आणि शिवसेना-भाजपा युती पहिल्यांदाच सत्तेत आले. मात्र पवारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.


>

मे १९९९ मध्ये पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, ‘१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,’उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे’ या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

>
१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.


>

२२ मे २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली.

>
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय ठरले.

>
२०१७ साली त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button