breaking-newsराष्ट्रिय

केरळमध्ये दुसऱ्या दिवशीही हिंसाचार

  • गावठी बॉम्ब आणि दगडफेक; १,३६९ जणांना अटक

तिरुअनंतपूरम – केरळमध्ये शबरीमला मंदिरात चाळीशीतली दोन महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी निदर्शकांनी विविध ठिकाणी गावठी बॉम्ब फेकले आणि दगडफेकही केली. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १३६९ जणांना अटक करण्यात आली असून ८०१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ७१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मलाबार देवस्वम मंडळाचे सदस्य के. शशिकुमार यांच्या कोझिकोडे येथील निवासस्थानावर गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आला, त्याचप्रमाणे पथनमथित्ता येथील अदूरमध्ये भ्रमणध्वनीच्या एका दुकानावरही बॉम्ब हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. कन्नूरमध्ये चार ठिकाणी गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आल्याचेही वृत्त आहे. कन्नूरमधील भाजपच्या कार्यालयास समाजकंटकांनी आग लावली, भाजप आणि सत्तारूढ माकपच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले आणि दगडफेकही करण्यात आली.

सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश देण्याच्या विरोधात शबरीमला कर्म समिती आणि आंतरराष्ट्रीय हिंदू समितीने गुरुवारी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते.

‘मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचे कारस्थान’

भोपाळ : शबरीमला मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ सूचना होती आणि त्याची अयोग्य प्रकारे अंमलबजावणी करून केरळमधील माकप सरकार मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचे कारस्थान करीत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे हिंदूविरोधी असल्याचा आरोप संघाच्या भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य-निमंत्रित जे. नंदकुमार यांनी केला आहे.

प्रवेशविरोधी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कोची : शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या माकपप्रणीत एलडीएफ सरकारविरुद्ध पुकारण्यात आलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचे शबरीमला कर्म समिती आणि भाजपने ठरविले आहे. अय्यप्पा मंदिराची परंपरा नष्ट करण्यासाठी माकप आणि मूलगामी संघटनेने गुप्तपणे हातमिळवणी केल्याचा आरोपही समितीने केला. माओवादी गटाच्या पाठिंब्यावर दोन महिलांनी शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणीही समितीच्या नेत्यांनी केली. मुख्यमंत्री पी. विजयन हे तणाव निर्माण करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

श्रीलंकेच्या महिलेचाही अयप्पा मंदिरात प्रवेश?

शबरीमला : दोन महिलांनी शबरीमला येथील अय्यपा मंदिरात बुधवारी सकाळी प्रवेश केल्याच्या घटनेनंतर गुरूवारी रात्री उशिरा श्रीलंकेच्या तामिळ महिलेने अय्यपा मंदिरात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत असून या महिलेने मंदिरात गेल्याचा इन्कार केला आहे, पण अधिकृत सूत्रांचे याउलट म्हणणे आहे. शशिकला नावाच्या या महिलेने सांगितले की, तिला अय्यपा मंदिरावर जाण्यासाठी डोंगरावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखले व माघारी पाठवले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत पूजाअर्चा केली.

शशिकला ही तिचा पती सर्वानन व मुलगा दर्शन यांच्यासमवेत होते. तिने सांगितले की, मला मंदिरात जाऊ देण्यात आले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button