कॉंग्रेस – जेडीएस लोकसभा एकत्रित लढणार

- दोन्ही पक्षांमधील खातेवाटपही जाहीर
बंगळुरू – कॉंग्रेस आणि जेडीएस पक्षांमधील खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. या दोन्ही पक्षांनी आगामी लोकसभेची निवडणूकही कर्नाटकात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी वेणुगोपाल यांनी दिली. येत्या 6 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज फोन वरून जेडीएस पक्षाचे अध्यक्ष देवेगौडा यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही कुमारस्वामी यांनी दिली. यावेळी दोन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमावरही चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांतील सत्ता वाटपाचे सर्व विषय निश्चीत करण्यात आले असून आता कोणत्याही विषयावर कोणताही वाद नाही असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार कॉंग्रेसच्या वाट्याला गृह, महसुल, बंगळुर शहर विकास, ग्राम विकास, कृषी, घरबांधणी, वैद्यकीय शिक्षण, नगर विकास, आरोग्य, उद्योग, साखर उद्योग, समाजकल्याण, वन आणि पर्यावरण, कामगार, खाणी, महिला बालकल्याण, अन्न आणि नागरीपुरवठा, विधी आणि न्याय, संसदीय व्यवहार, विज्ञान तंत्रज्ञान, महिती तंत्रज्ञान, क्रिडा व युवक कल्याण, परिवहन विकास, बंदरे, सांस्कृतिक इत्यादी खाती आली आहेत. तर जेडीएस पक्षाच्या वाट्याला अर्थ, उत्पादन शुल्क, माहिती, इंटेलिजन्स, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, उर्जा, सहकार, पर्यटन, शिक्षण, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, लघु उद्योग, परिवहन, लघु पाटबंधारे इत्यादी खाती सोपवण्यात आली आहेत. उर्वरीत खात्यांचे वाटप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सल्लामसलतीने करणार आहेत. 6 जून रोजी होणाऱ्या विस्तारात सर्व 32 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.