breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

गावडे भवन कामगारांचे स्फुर्ती केंद्र व्हावे.- गिरीष बापट

थेरगांवमध्ये कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचा भुमिपुजन समारंभ 

पिंपरी – कामगार संघटना कामगारांच्या प्रगतीसाठी असली पाहिजे. कामगारांच्या कष्टामुळे त्यांच्या कुटूंबाची व देशाची प्रगती होते. कामगार केंद्रबिंदू ठेवून कर्मचारी महासंघ शंकर गावडे यांच्या प्रेरणेतून काम करीत आहे. त्यांच्या नावाने स्मृती कामगार भवन हे महाराष्ट्रातील कामगारांसाठी स्फुर्ती केंद्र व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

थेरगाव येथील कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचा भुमिपुजन समारंभ आज (रविवारी) पालकमंत्री बापट यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अपक्ष गटनेते कैलास बारणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका झामाबाई बारणे, निर्मलाताई कुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, कर्मचारी महासंघाचे शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, पतसंस्थेचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, समिती सदस्य चारुशीला जोशी, अंबर चिंचवडे, राजेश लांडे, चंद्रकांत इंदलकर, विजय खोराटे, मनोज माछरे, माणिक बुचडे आदींसह उपस्थित होते.  बापट म्हणाले की, पिंपरी चिंचवड मनपातील व पीएमपीएलच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी पुढील महिन्यात मी स्वत: पुढाकार घेऊन कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींसह आयुक्तांबरोबर बैठक घेईल.

खासदार अमर साबळे म्हणाले की, जागतिकीकरणामुळे ‘हायर ॲण्ड फायर’ पॉलिसीमुळे कामगारांचे शोषण वाढत चालले आहे. ही महापालिका जरी श्रीमंत असली तरी येथे बौध्दीक श्रीमंती नाही. म्हणजेच ‘मानधन कामगार’या नावाखाली कामगारांचे शोषण होत आहे. देशातील कामगारांचे प्रश्न आणखी बिकट होत आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. कामगारांकडून जमा होणारा हजारों कोटींचा निधी शासकीय तिजोरीत पडून आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बबन झिंजुर्डे म्हणाले की, पीसीएमसीतील घंटागाडी कर्मचा-यांच्या प्रश्न तडजोडीने सोडविला जावा. तसेच पीएमपीएल व्यवस्थापनाकडून पुर्व पीसीएमटीच्या कर्मचा-यांवर नेहमीच अन्याय केला जातो. तसेच मानधनावरील कर्मचा-यांचे देखील आर्थिक शोषण केले जाते. यावर पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा. शासनाकडे हजारो टन तूरडाळ पडून आहे. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. पिंपरी चिंचवड कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने राज्यातील शेतक-यांना मदत व्हावी म्हणून शासनाकडून दहा लाख रुपयांची तूरडाळ खरेदी करुन पतसंस्थेच्या सभासदांना मोफत वाटण्यात येणार आहे. या कर्मचारी महासंघाकडून कर्मचा-यांच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वारक-यांना अन्नदान, पावसाळी साधने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत चौगुले आणि आभार हनुमंत लांडगे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button