breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कामशेत येथील गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

  • हत्या की आत्महत्या याबाबत साशंकता
    संशयावरून दोन जण ताब्यात

कामशेत – तरूणाच्या डोक्‍यात पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याच्या संशयावरून कामशेत पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. खून झालेला तरूण आणि संशयित आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. सुरूवातीला संशयित आरोपींनी त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, मृत तरूणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास कामशेत येथील एका हॉटेलमध्ये घडली.

कामशेत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र मागते यांनी याबाबत माहिती दिली. निहाल पांडुरंग नाणेकर (वय 23, रा. तानाजीनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. निहालचे वडील पांडुरंग सहदेव नाणेकर यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकी अनिल घोलप आणि संकेत वसंत साटणकर (दोघे रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत निहालसह संशयित आरोपी विकी आणि संकेत हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर चिंचवड, वाकड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

निहाल, विकी आणि संकेत हे एकमेकांचे मित्र आहेत. संशयित आरोपींनी सुरूवातीला निहालने आत्महत्या केल्याचे पोलीसांना सांगितले. त्यांनी सांगितलेलया घटनाकमानुसार, संशयित आरोपी आणि निहाल रविवारी सुट्टीनिमित्त लोणावळ्याला फिरायला गेले होते. रात्री लोणावळ्याहून परतत असताना साडेआठच्या सुमारास कामशेत येथे आले असता पाऊस सुरु झाला. त्यामुळे तेथील राजवाडा हॉटेलमध्ये थांबले. खाण्यासाठी भजी मागवली. त्यावेळी 12 दिवसांपूर्वी चिंचवड येथे खून झालेल्या आकाश लांडगे याच्या एका नातेवाईकाचा निहालला फोन आला. सोमवारी आकाशचा बारावा विधी आहे. त्या कार्यक्रमात तू जेवायला ये, अशी माहिती त्या नातेवाईकाने फोनवर दिली. फोन झाल्यानंतर निहालला मित्राच्या खुनाचे दुःख सहन झाले नाही. निहालने स्वतःच्या कमरेला असलेल्या गावठी पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या डोक्‍याला लागली. यामध्ये निहाल गंभीर जखमी झाला.
घटना घडल्यानंतर दोन तासांनी रात्री साडेदहा वाजता ते बेशुद्धावस्थेतील निहालला घेऊन थेरगाव येथील खासगी रुग्णालयात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. हा प्रकार कामशेत पोलीसांना कळविण्यात आला. पोलिसांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली. संशयित आरोपींनी निहालने आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, निहालचे वडील पांडुरंग यांच्या म्हणण्यानुसार, निहाल कोणत्याही तणावात नव्हता. तसेच कोणत्याही तणावातून तो आत्महत्या करू शकणार नव्हता. त्यामुळे संशयित आरोपींनीच आपआपसातील वादातून निहालचा खून केला, असा संशय व्यक्‍त केला. त्यामुळे निहालच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, दोन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मच्छिंद्र मागते यांनी सांगितले. संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button