ताज्या घडामोडीपुणे

अयोध्या दौरा स्थगित का केला, राज ठाकरेंच्या भाषणातला शब्द न शब्द जसाच्या तसा…

पुणे |“भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर आपलं आंदोलन सुरु झालं. त्यानंतर मी अयोध्या दौऱ्याची पुण्यातूनच घोषणा केली. तारीख जाहीर केली… मग कुणी काय काय बोलतंय, हे मी सगळं पाहत होतो. तिकडे कुणीतरी माझ्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी वल्गना केली गेली. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून सगळी माहिती मिळत होती. मला अनेकजण विविध प्रकारची माहिती सांगत होते. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या विरोधाचा सगळा ट्रॅप आहे. आपण याच्यात फसता कामा नये”, असं सांगत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्यापाठीमागची सगळी पार्श्वभूमी सांगितली.

उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या कडव्या विरोधानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यातून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आजच्या भाषणात या विषयावर राज ठाकरे काय बोलणार याची सर्वात जास्त उत्सुकता होती. अखेर एक एक करुन राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्यामागची कारणं सांगितली.

महाराष्ट्रातून माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद पोहोचली, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

“माझा अयोध्या दौरा अनेकांना खुपला. त्याच उद्देशातून अनेकांनी माझ्या अयोध्या दौऱ्याविरोधात रसद पोहोचवली. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. माझ्या उत्तर भारतीयांविरोधातील भाषणांचा पुन्हा विषय काढा, असं सांगितलं गेलं. त्यातूनच मग माफी मागा, वगैरे अशा मागण्या झाल्या. मी अयोध्या दौऱ्यावर जाणार, रामलल्लाचं दर्शन घेणार हे आलंच.. पण ३५-४० वर्षांपूर्वी तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळी जन्माला देखील आले नसतील. त्यावेळी आजच्या सारखी चॅनेल नव्हती. त्यावेळी दूरदर्शन चॅनेल होतं. त्यावेळी न्यूज रिल्स दाखवले जायचे. मुलायमसिंग यांचं सरकार सत्तेत असताना अनेक कारसेवकांना ठार मारण्यात आलं. सगळ्या कारसेवकांच्या प्रेतांचा खच मी शरयू नदीच्या किनारी पाहिला होता.. त्यांची प्रेत मी तरंगताना पाहिली होती.. मला रामलल्लाचं दर्शन तर घ्यायचं होतंच पण तिथे माझे कारसेवक मारले गेले, तिथल्या जागेचंही मला दर्शन घ्यायचं होतं…. असो राजकारणातल्या अनेकांना भावना समजत नसतात.. नाही समजल्या तर नाही समजल्या…..”

“माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या प्रकारचं वातावरण तिकडे उभं केलं जात होतं.. मी हट्टाने तिकडे जायचं ठरवलं असतं तर माझ्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर गेली असती त्यांच्या अंगावर…. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला सडवलं गेलं असतं… तुम्हाला जेलमध्ये टाकून त्रास दिला असता… तेव्हा हा सगळा ससेमिरा तुमच्या पाठीमागे लागला असता.. मी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्याशी बोललो… त्यांना मी सांगितलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी… “, असं म्हणत राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचा ट्रॅप कसा हाणून पाडला त्याचं विश्लेषण केलं.

एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो

“एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का… याला अनेक पापुद्रे आहेत. मला सगळं सांगणं शक्य नाही.. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करतायत… मी शिव्या खायला तयार आहे”

कार्यकर्त्यांनो राजकारण समजून घ्या..!

“आता जाग झाली, राज ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे वगैरे… १२-१४ वर्ष कुठे होती ही सगळी माणसं… एक सांगतो यातून चुकीचे पायंडे पडतायत…. विषय माफी मागण्याचाच आहे ना… गुजरातमध्ये अप्लेश ठाकूर म्हणून एक गृहस्थ आहे… उत्तर प्रदेश बिहारमधून जी माणसं कामासाठी गेली होती… तिथे कुणाकडून तरी एका मुलीवर बलात्कार झाला… त्यावेळी १५ ते २० हजार माणसांना मारण्यात आलं, हुसकावण्यात आलं… मग ती माणसं महाराष्ट्रात आली.. पुन्हा युपीत गेली.. मग या सगळ्या प्रकरणात कोणी माफी मागायची…. तुम्ही हे सगळं राजकारण समजून घेण्याची गरज आहे…”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button