ताज्या घडामोडीविदर्भ

‘हिंदू कधीही कट्टर होऊ शकत नाही’, अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

नागपूर | ‘माणुसकीने वागणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच हिंदू धर्म आहे. हिंदू असणे म्हणजेच माणूस असणे आहे. जो धर्म नियमांनी बांधलेला असतो, तेथे कट्टरता निर्माण होते. हिंदू कधीही कट्टर होऊ शकत नाही, कारण येथे कोणतेही कडक निर्बंध नाहीत. शंभर टक्के नास्तिक माणूसही हिंदू म्हणविला जातो, आहे हे या धर्माचे अद्भुत सौंदर्य आहे’, असे मत अभिनेता आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी मांडले.

मैत्री परिवार आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेच्यावतीने शनिवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित ‘भारत : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे तसेच प्रमोद पेंडके उपस्थित होते.

‘भूतकाळ माहिती नसेल तर वर्तमान आणि भविष्य ठरवता येत नाही. आम्हाला आमच्या देशाचा इतिहास विसरायला आमच्या राज्यकर्त्यांनीच भाग पाडले, म्हणून भूगोल बिघडत गेला. मूळ भारतातील ५० टक्के भूभाग आम्ही याआधीच गमावला आहे. मागील १३०० वर्षांत सतत आक्रमणे झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले, मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या. पण, हिंदू धर्म संपला नाही. हा देश इस्लामिक राष्ट्र झाले नाही. या हिंदू धर्मात काय जादू आहे हे एकदा समजून घेतले पाहिजे. या धर्माचे इस्लामीकरण कधीही होऊ शकणार नाही. कुणी मूर्ती तोडल्या म्हणून ते आमच्यातील राम, कृष्ण आणि महादेव संपवू शकले नाहीत’, असे पोंक्षे म्हणाले.

हा देश आता हिंदू राष्ट्र होणार आहे आणि येथील अहिंदूंची स्थिती अत्यंत वाईट होणार आहे, हे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जाते आहे. हे करण्यात अहिंदूंपेक्षा पुरोगामी हिंदूच पुढे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रास्ताविकातून संजय भेंडे यांनी मैत्री परिवार आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या उपक्रमांची माहिती दिली. श्रुती बाईवार आणि सरोज पेशकर यांनी सरस्वती वंदना तसेच ‘जयोस्तुते’चे गायन केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. प्रमोद पेंडके यांनी आभार मानले.

सिंधू नदी गेल्याचे दु:ख का नाही?

‘रामायण आणि महाभारताच्या काळात या देशात इतर धर्मच नव्हते. वाळवंटातील टोळ्या येथे आल्या तेव्हा त्यांना सिंधू नदीपार स्वर्ग आहे, हे दिसले. सिंधू नदीमुळे हिंदू आणि हिंदुस्थान ही आपली ओळख आहे. ती सिंधू नदी आपल्या देशापासून हिरावली गेल्याचे कुणालाही दु:ख होत नाही. ज्यांना पाहुणे म्हणून जागा दिली, त्यांनी पूर्ण भूमीवरच हक्क सांगायला सुरुवात केली. असे घडले, कारण आम्ही शौर्याचा इतिहास विसरलो. हे पुन्हा होऊ द्यायचे नसेल तर आपला इतिहास माहिती असणे आवश्यक आहे’, अशी भूमिका शरद पोंक्षे यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button