ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास राष्ट्रीय कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरणार : आयुक्त शेखर सिंह

‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळा

पिंपरी : शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग आणि नाविन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक असून सार्वजनिक परिसर पादचाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ञांच्या सहकार्याने आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत. या उपक्रमाच्या यशस्वी पुर्ततेसाठी ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास राष्ट्रीय कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरी रस्ते आणि सार्वजनिक परिसर नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळांचा उद्देश प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे तसेच चर्चेद्वारे रस्ते बांधणीच्या आधुनिक उपाययोजनांवर चर्चा करणे, रस्ते बांधणीच्या टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करणे आणि रहदारी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा आहे. पिंपरी चिंचवड शहरातही या मालिकेतील तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग.दि.माडगूळकर प्रेक्षागृह येथे दि. १२ व १३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा पहिला दिवस आज पार पडला, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.

या कार्यशाळेवेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उपआयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, शिरीष पोरेडी, लक्ष्मीकांत कोल्हे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, परवानाकृत व्यावसायिक वाहतूक संचालन अभियंता प्रताप भोसले, अभिमान भोसले, पर्यावरण शिक्षण केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमर करण, स्मार्ट सिटी सल्लागार विकास ठाकर, प्रांजली देशपांडे, प्रसन्न देसाई यांच्यासह ४३ शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पैलूंवर काम करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्त्यांचा आणि सार्वजनिक परिसरांचा विकास होणे गरजेचे असून या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत मिळेल, असा विश्वासही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला तसेच हरित सेतूची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रीन बॉण्ड आणि सायकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट (बीआयसीआय) चा वापर केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसीच्या शाश्वत मोबिलिटीच्या प्रांजली देशपांडे आणि ट्रॅफिक ऑपरेशन्स व्यावसायिक प्रताप भोंसले यांसारख्या तज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रांनी, रस्त्याच्या डिझाइनमध्ये डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. स्मार्ट सिटी सल्लागार अमर करण यांनी पिंपरी चिंचवड येथील तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेत प्रभावी स्ट्रीट डिझाईन प्रकल्प राबविण्याच्या गुंतागुंतीवर अभ्यासपुर्ण सादरीकरण केले. त्यांनी धोरणात्मक आव्हाने नमूद करत, कार्यक्षम आणि उपयुक्त रस्ते तयार करण्याच्या दृष्टीकोणांवर भर दिला. विकास ठकार यांनी रस्त्यावरील डिझाईन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आव्हाने कमी करण्यासाठी अंमलात येणाऱ्या धोरणांची माहिती दिली.

या कार्यशाळेत निखील कन्स्ट्रक्शन, शिवम इंडस्ट्रीज आणि स्नेह प्रीकास्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात रस्ते सौंदर्यीकरण आणि विकासकामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिमेंट, काँक्रीटच्या साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. कार्यशाळेच्या १३ जानेवारी रोजीच्या सत्रात फ्रीडम टू वॉक सायकल रन कार्यक्रमातील विजेत्या शहरांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button