Uncategorized

खाशाबामय चैतन्यमूर्ती संजय दुधाणे

15 जानेवारी रोजी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांचे नाव जगभर पोहचविणारे लेखक संजय दुधाणे यांच्या खाशाबा विषयक कार्याची ही गौरवगाथा…

ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर 1980 च्या दशकात कोणालाच ज्ञात नव्हते. आजच्यासारखी सोशल मिडिया, इंटरनेट नसल्याने देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकूनही खाशाबा जाधव हे नाव काळाच्या प्रवाहात लुप्त झाले होते. 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकपासून खाशाबांच्या नावाचा जयघोष हळूहळू दुमदुमू लागला. तो लेखक, पत्रकार व क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे यांच्या अथक प्रयासामुळे. 2001 मध्ये खाशाबा जाधव यांची केवळ चरित्रगाथा लिहून दुधाणे थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष खाशाबा हे नाव अजरामर होण्यासाठी झटत आहेत. खाशाबामय चैतन्यमूर्ती दुधाणे यांच्या संकल्पनेतूनच आज 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे.

आंध्र प्रदेशच्या करनाम मल्लेश्वरीने 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मल्लेश्वरीला 25 लाखांची थैली देऊन गौरविण्यात आले. खाशाबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान राखावा, ही साधी मागणी दुधाणे यांनी तत्कालीन क्रीडामंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मुंबईत जाऊन केली. त्याच दिवशी संध्याकाळी मल्लेश्वरीला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रम संपताच दुधाणे यांनी थेट मुख्यामंत्र्यांना गाठले. ‘‘खाशाबांवर अन्याय होतोय, त्यांच्या कुंटुबियांनाही मदत केली पाहिजे,’’ अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यावेळी दुधाणेंसह खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांना धक्कबुक्की झाली. उभ्या महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले. ‘आंध्रच्या मल्लेश्वरीला पैठणी, खाशाबांच्या आप्तांना धक्काबुक्की’ या मथळ्याने उभ्या महाराष्ट्रात बातम्या आल्या. या घटनेनंतर खाशाबांना शासन, कुस्तीशौकिन, क्रीडाचाहते, कराडमधील नागरिकही का विसरले, याचा शोध दुधाणे यांनी सुरू केला. खाशाबांवर काही लेखन-पुस्तक आहे का, याचा धांडोळा त्यांनी घेतला. मात्र, काहीच हाती आले नाही. मग यातूनच ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ पुस्तकाचा जन्म झाला. दुधाणे यांच्या आंदोलनामुळे खाशाबांच्या पत्नी कुसुम जाधव यांना 2001 मध्ये पाच लाख रूपयांची मदतही मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. यापूर्वी खाशाबा जाधव यांच्या परिवाराला इतका मोठा मदतनिधी कधीच मिळाला नव्हता.

खाशाबा  जाधव यांच्या नावाने झपाटून गेलेल्या संजय दुधाणे यांनी 2001 मध्ये दै.लोकमतच्या नोकरीचा राजीनामा दिला. 2001 मध्ये खाशाबांचे स्मारक उभे करण्यासाठी कराडमध्ये स्मारक समितीची स्थापना केली. त्यांच्या जीवन चरित्र लेखनासाठी सलग 8 महिने संशोधन करून ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले. नांदेडमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. हातोहात पहिली आवृत्ती संपली. उभ्या महाराष्ट्रात पुस्तक गाजले. तेव्हापासून देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्यांची यशोगाथा आणि शोकांतिका महाराष्ट्राला समजून आली. खाशाबांच्या अभूतपूर्व कामगिरीचा मराठीविश्वाला सर्वप्रथम परिचय झाला. 2004 मध्ये शालेय अभ्यासक्रमात नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात खाशाबांवरील दहा पानी धडा माझ्या पुस्तकातून घेण्यात आला. सार्‍या महाराष्ट्राच्या शाळेत, घरात खाशाबा पोहचले. इंग्रजी 3 री व मराठी 6 वीच्या पुस्तकात असे एकूण 3 वेळा संजय दुधाणे यांच्या पुस्तकातून खाशाबा हे नाव घराघरात पोहचले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ठ वाङ्मयाचा शाहू महराज पुरस्कार प्राप्त झाला असून, भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्टने या पुस्तकाची मराठीसह हिंदी आवृत्ती प्रकाशित केली आहे. संजय दुधाणे लिखित पुस्तकाच्या आधारेच विकीपिडीयासह वृत्तपत्र पत्रकारांना खाशाबांची माहिती सहज उपलब्ध झाली. आज गुगल, इंटरनेटवर खाशाबांची जी माहिती उपलब्ध आहे त्याचे सारे श्रेय संजय दुधाणे यांच्या पुस्तकाला जाते. लेख लिहिण्यापुरताच गुगुलवरील माहिती उपयोगी पडते. खाशाबांचे समग्र चरित्रासाठी दुधाणे यांचे पुस्तकच एकमेव साधन आहे.

ध्रुवतारा फाऊंडेशनच्या वतीने संजय दुधाणे हे 2010 पासून 15 जोनवारीला खाशाबांची जयंती साजरी करीत आहोत. फाऊंडेशनचे अध्यक्ष असलेले संजय दुधाणे हे 2021 पासून खाशाबा जाधव पुरस्कार समारंभाचे आयोजन करीत आहेत. खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्या हस्ते पहिला पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला होता. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट जन्मदिन केंद्र शासन राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरे करते. याच धर्तीवर खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करावा अशी गेल्या 12 वर्षांपासून आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी होती. अखेर 2023 मध्ये राज्य क्रीडा दिनाचा शासन आदेश निघाला आणि खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षींच पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण राज्यात साजरा झाला. पहिल्यावहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त जागतिक दर्जाच्या पुणे शहरातील शिवछत्रपती क्रीडा नगरीत खाशाबांचे तैलचित्रही बसविण्यात आले. हे तैलचित्र बसविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुधाणे यांनी मागणी केली होती.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी खाशाबांचे पहिले रंगित छायाचित्राची निमिर्तीही दुधाणे यांनी केली. याच छायाचित्राचे पूजन देशभर केले जाते. पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संग्राहालयात हेच छायाचित्र झळकत आहे. ते दुधाणे यांनीच 2004 मध्ये कुस्ती प्रशिक्षक भा. ल. भागवत यांना संग्रहालयात झळकविण्यासाठी दिले होते.

2001 मध्ये पुण्यातील पोलिस वसाहतीमधील सभागृहाला दुधाणे यांच्या प्रयत्नातून खाशाबा जाधव सभागृहाचे नामकरण करण्यात आले. खाशाबांचे दुर्मिळ छायाचित्र असणारे कँलेडरही या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले. खाशाबांच्या पत्नी कुसुम जाधव व माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते नामकरण व प्रकाशन करण्यात आले होते. कात्रज डेअरीकडून मामासाहेब मोहोळ संकुलाकडे जाणार्‍या रस्त्याला खाशाबा जाधव यांचे नाव पत्रकार मनोज आवळे व संजय दुधाणे यांच्या प्रयत्नामुळेच 2012 मध्ये देण्यात आले.

पुण्यात 2001 मध्ये तत्कालिन केंद्रिय क्रीडा मंत्री उमा भारती पुण्यात आल्या होत्या. तेव्हा खाशाबा जाधवा स्मारक उभे करण्यासाठी व त्याना अर्जून पुरस्कार देण्यााबाबत दुधाणे यांनी मागणी केली होती. नामदार उमा भारती यांनी विशेष प्रस्ताव देत त्याच वर्षी मरणोत्तर खाशाबा जाधव यांना अर्जून पुरस्कार जाहिर केला. पुणे विद्यापीठाच्या खाशबा जाधव क्रीडासंकुल नामकरणासाठी संजय दुधाणे आघाडीवर होते. कराडमधील कार्वे नाका जवळील स्मृती शिल्प निर्मितीच्या संकल्पनेही दुधाणे यांचे योगदान आहे. खाशाबांचे लाखमोलाचे पदक सर्वप्रथम प्रदर्शित करण्याचा मानही संजय दुधाणे यांच्याच जातो. 2000 सिडनी व 2008 बिजिंग ऑलिम्पिकनिमित्ताने खाशाबा जाधव यांच्या पदकासह ऑलिम्पिक प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात दुधाणे यांनी भरवले होते.

100 पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालय, क्रीडा संस्था, क्रीडा शिक्षकांना खाशाबा जाधव यांचे पोस्टर व पुस्तक संजय दुधाणे यांनी भेट देऊन खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी साजरी केली आहे. खाशाबा जाधव यांच्या चरित्र लेखनापासून ते त्याच्या पुण्यातील क्रीडासंकुलामधील तैलचित्र अनावरणापर्यंत दुधाणे यांची धडपड जगाने पाहिली आहे. अनेक पत्रकार तर त्यांना खाशाबा या टोपण नावाने संबोधतात. असे खाशाबामय झालेले दुधाणे आता राज्य शासनाने खाशाबांचे आठवणींना उजाळा देणार्‍या स्मारकाची उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत.

खाशाबाप्रमाणेच पुण्यातील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते बाबू निमल, पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते भीमराव केसरकर, ऑलिम्पिकपटू बंडा पाटील, ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांच्या सन्मानासाठी दुधाणे झटत आहेत. पॅरीस ऑलिम्पिकवीर सचिन खिलारी व स्वप्नील कुसाळे यांच्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी दुधाणे अग्रेसर होते.

खाशाबांसह अनेक क्रीडापटूंना न्याय देणारे लेखक, पत्रकार, क्रीडा अभ्यासक आणि क्रीडा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून संजय दुधाणे यांनी केलेल्या कामगिरीला सलाम हा दिलाच पाहिजे.
– राजेंद्र मकोटे कोल्हापूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button