विजय यांच्यापासून मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच; तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच सुटेना!

Joseph Vijay Tamil Nadu CM post claim faces a sudden setback as VCK delays formal support letter to the Governor : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा जोसेफ विजय यांचा पक्ष टीव्हीके राज्यात सत्ता स्थापन करेल असे मानले जात होते. मात्र शुक्रवारी या राजकीय नाट्याला आणखी एक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.
टीव्हीके नेते आणि समर्थकांना काल दिवसभर काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम) च्या पाठिंब्याने आणि व्हीसीके व आययूएमएलच्या अपेक्षित पाठिंब्याच्या जोरावर पक्षाने ११८ जागांचा बहुमताचा पार केल्याबद्दल विश्वास वाटत होता. यामुळे विजय यांच्या पनायूर येथील निवासाबाहेर फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली तसेच पक्षाच्या कार्यकर्ते शनिवारी सकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याबद्दल उघडपणे बोललेदेखील. मात्र त्यानंतर टीव्हीके पक्षाचे पाठिंब्याचे गणित पुन्हा डळमळू लागल्याचे दिसून आले.
व्हीकेसीचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याबाबत डावे पक्ष घेतील त्या निर्णयाचे पालन करेल असे जाहीरपणे म्हटले होते, मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे औपचारिकपणे आपल्या पाठिंब्याचे पत्र सादर केले नव्हते. यामुळे तांत्रिकदृष्ट्या विजय यांचा गट बहुमतापासून दूर राहिला.
राज्यपाल कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांच्या पक्षाकडे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीमध्ये फक्त ११६ आमदारांचा पाठिंबा होता.
हेही वाचा – राज्यात वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट
विजय यांच्या सत्तास्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थिरुमावलवन यांनी रात्रभर आणि पुढे शुक्रवारपर्यंत टीव्हीके, एआयडीएमकेचे एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि डीएमके नेत्यांबरोबर बैठका केल्या.
व्हीसीके डाव्या पक्षांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर राहील असे पत्रकारांना सांगितल्यानंतरही थिरुमावलवन यांनी त्यांचा अंतिम निर्णय रात्री उशीरापर्यंत जाहीर केला नव्हता. हा निर्णय जाहीर करण्याऐवजी ते तमिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी पोहोचले, येथे रात्री १० वाजून गेल्यानंतरही चर्चा सुरू होती.
यामुळे तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. व्हीसीके वर्तुळात होत असलेल्या एका दाव्यानुसार, ईपीएस आणि स्टॅलिन यांच्यात अशा योजनेवर चर्चा झाली ज्याअंतर्गत स्वतः थिरुमावलवन हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर येऊ शकतील.
आणखी दुसऱ्या एका लहानशा पण महत्त्वाच्या घडामोडीमुळे आकड्यांचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले.एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या एएमएमके पक्षाचे टीटीव्ही दिनकरण यांनी रात्री ९ नंतर राज्यपालांची भेट घेतली. या पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. दिनकरण यांनी विजय यांच्या टीव्हीकेकडून घोडेबाजार होत असल्याची तक्रार केली तसेच त्यांचा एकमेव आमदार बेपत्ता असल्याचा दावा केला.





