Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांवर पणन विभागाची करडी नजर; बाजार समित्यांना भेसळ रोखण्याच्या सूचना

मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पणन विभागाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांना शेतमालातील भेसळ व रासायनिक प्रक्रिया रोखण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य यामध्ये घातक रसायनांचा वापर होत असल्याचा संशय आल्यास तातडीने तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागातर्फे देण्यात आले आहेत.

वाशीतील मुंबई एपीएमसी फळ बाजारात अलीकडेच एपीएमसी प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून संशयित आंब्यांचे नमुने जप्त केले होते. बाजारात वाढती मागणी लक्षात घेऊन काही व्यापाऱ्यांकडून कच्चे आंबे कमी वेळात पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पणन संचालनालयाने शुक्रवार, ८ मे रोजी राज्यभरातील बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.

परिपत्रकानुसार, बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांची वेळोवेळी काटेकोर तपासणी करावी. फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी रसायनांचा वापर, फळे-भाजीपाल्याला कृत्रिम रंग देणे किंवा शेतमाल अधिक काळ टिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्यास तत्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा –  ‘समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे’; मंत्री संजय शिरसाट

संशयित शेतमालाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवून दोषी आढळणाऱ्यांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. भेसळ करणाऱ्या परवानाधारक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबरोबरच त्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा तातडीने काढून घेण्याची कार्यवाही करण्याबाबतही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत बाजार समित्यांना शेतमाल व्यवहारांचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा माल योग्य पद्धतीने विकला जावा, ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच दर्जेदार शेतमालाला प्रोत्साहन मिळावे, हा नियंत्रित बाजार व्यवस्थेचा उद्देश असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भेसळीबरोबरच वजन-मापांबाबतच्या तक्रारींचेही नियमानुसार निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच थेट पणन, खाजगी बाजार आणि शेतकरी ग्राहक बाजारांमधील व्यवहारांवरही या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, परिपत्रकात पर्यावरणीय बाबींवरही भर देण्यात आला आहे. फळे, भाजीपाला आणि फुलांच्या वाहतूक व साठवणुकीदरम्यान विहित जाडीपेक्षा कमी प्लास्टिक तसेच थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढवावा, असेही बाजार समित्यांना सूचित करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button