ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली? : राष्ट्रवादीशी पंगा पडा महंगा!

तडकाफडकी बदली होणार : सुहास दिवसे किंवा राजेश देशमुख यांच्या नियुक्तीची शक्यता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची तडकाफडकी बदली होणार असून, त्यांच्या जागी सुहास दिवसे किंवा राजेश देशमुख या दोघांपैकी एकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला असून, कोणत्याही क्षणी सिंह यांना बदलीचा आदेश येवू शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळली आहे.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून राजेश पाटील यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली होती. भाजपासाठी पाटील चांगलेच डोकेदुखी ठरले होते. त्यानंतर महायुतीच्या सत्ताकाळात पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आणि दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी शेखर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.

शिवसेना आणि भाजपाच्या सत्ताकाळात शेखर सिंह यांनी विकासकामांचा धडाका लावला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह भाजपा विरोधकांच्या ते कायम रडारवर राहिले होते. इंटरनेट केबल डक्टींग, भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलपासून वाकडमधील टीडीआरच्या कथित घोटाळ्यापर्यंत शेखर सिंह राष्ट्रवादीसह विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अजित पवार गट ‘महायुती’मध्ये सहभागी झाला. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती झाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीबाबत वारंवार तक्रारी केल्या. वाकडमधील टीडीआर प्रकरणामुळे सिंह यांच्याविरोधातील वातावरण शिगेला पोहोचले. त्यामुळे शेखर सिंह यांना ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बदलीचा सामना करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, शिवसेना, भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि आमदार, खासदारांना विश्वासात न घेता आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात येत आहे. त्यामुळे सेना-भाजपाच्या गोटात नाराजी आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दबावामध्ये बदली होत असेल आणि सेना-भाजपाची प्रशासकीय कोंडी होणार असेल, तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्याला ताकद कशी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याला संधी?
दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती देण्यात येणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे आयुक्त सुहास दिवसे या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. डॉ. राजेश देशमुख हे २००८ च्या तुकडीतील अधिकारी असून, कॅबिनेट मंत्री व तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारी असताना त्यांनी ७२ गावांचा कायापालट केला होता. तसेच, सुहास दिवसे हे २००५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयात आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत, असे बोलले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button