breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव तसेच ॲडव्हांटेज विदर्भाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात

नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार : नितीन गडकरी

नागपूर : उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात ॲडव्हाँटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

खासदार औद्योगिक महोत्सव नागपूर अर्थात ॲडव्हांटेज विदर्भ उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ असून विदर्भातील मोठ्या उद्योग समूहाचे प्रदर्शन आणि गुंतवणुकीचे संमेलन सध्या नागपूर येथे सुरू आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, खासदार अनिल बोंडे, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार व उद्योजक अजय संचेती, आमदार आशिष जायस्वाल, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी गुंतवणुकदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते.केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे एक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे.मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे आहे.

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरकडे होणार आहे. नागपूर पासून मुंबई प्रमाणे गोवा महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. त्याला शक्तीपीठ महामार्ग संबोधले जाईल.नागपूरचे नवीन विमानतळ जागतिक मानांकनाचे असेल याकडे आम्ही लक्ष वेधले आहे. सोबतच अमरावती, अकोला विमानतळाला अद्यावत करणार आहोत.गडचिरोलीमध्येही आमचे विमानतळ तयार होत आहे. चंद्रपूरचेही विमानतळ आम्ही लवकरच पूर्णत्वास घेऊन जाऊ, त्यामुळे रस्ते लोहमार्ग व विमान मार्गाने नागपूर व विदर्भ प्रत्येक प्रदेशाशी जोडला गेला आहे.

हेही वाचा – ‘मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम’; इम्तियाज जलील यांचं ट्वीट चर्चेत

चार्मोशी पासून ‘वॉटर वे’ तेलंगणा पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. वैनगंगा ते नळगंगा ५५० किलोमीटरचा कॅनॉल आम्ही तयार करीत आहोत. 2024 मध्ये या कामाला सुरुवात होऊन सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त शेतीला पाणी पुरवठा करता येईल.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह उद्योगाचा पाया रचला असून याठिकाणी उत्तम भविष्य दिसून येत आहे. मुख्यमंत्री असताना सुरू केलेला लोह उद्योग आता विस्तारित होत असून लवकरच गडचिरोली पोलाद उद्योगाचे हब होईल याची मला खात्री आहे.

केवळ नागपूर नव्हे संपूर्ण विदर्भातील सर्व जिल्हे विकसित व्हावे व त्यादृष्टीचे नियोजन, क्लस्टर निर्मितीला आणि प्राधान्य देत आहोत. याशिवाय कोळशावर तयार होणाऱ्या गॅसपासून (कोल गॅसीफिकेशन ) घरगुती वापराच्या गॅस निर्मिती संदर्भात चंद्रपूरमध्ये काही प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता आहे.यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

भांडवल, पायाभूत सुविधा यासोबतच मनुष्यबळांची आवश्यकता ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे नागपूरमध्ये मनुष्यबळ कौशल्य युक्त व्हावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संरक्षण, पर्यटन या क्षेत्रातही मोठे उद्योग उभारण्याची विदर्भात संधी आहे.स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप करण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहे.

‘नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार’;  नितीन गडकरी

विदर्भाच्या विकासासाठी काय करता येईल,याच्या विचार मंथनासाठी ॲडव्हांटेज विदर्भ व खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.गडचिरोलीपासून वाशिम पर्यंत आणि बुलडाण्यापासून गडचिरोलीपर्यंत आम्ही चांगले रस्ते तयार केले.

पाणी, वीज, पायाभूत सुविधा, विस्तीर्ण रस्ते, तंत्रज्ञान यासह  केंद्रातून कोणतीही मदत लागल्यास मी तत्पर आहे. राज्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार आहेत. सोबतीला राज्याचे माजी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम मंत्री नारायण राणे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे .त्यामुळे आता विदर्भात विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदारांनी आरोग्य, अभियांत्रिकी, औषधी,पर्यटन, हॉटेल व्यवसाय व अन्य लॉजिस्टिक सारख्या मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘गडकरी फडणवीस यांचे डबल इंजिन विदर्भाचा सुवर्णकाळ’; नारायण राणे

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भाचा पूर्ण अभ्यास आहे. कुठे काय निर्माण होऊ शकते, कोणत्या जिल्ह्याला कोणता उद्योग उपयोगी पडू शकते यशस्वी होऊ शकते, याची माहिती असणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा हा सुवर्णकाळ आहे.

‘गडकरींच्या परिस्पर्शात विदर्भ विकासाची सूत्रे आहेत’; मुनगंटीवार

तत्पूर्वी, राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित गुंतवणुकदारांना संबोधित केले. विदर्भात वन, पाणी,वीज, जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला काय सुविधा हवी ते सांगा. आम्ही सगळे तत्पर आहोत. ज्यांच्या कर्तुत्वाला अवघ्या भारताने सलाम केला असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी मदतीला तयार आहेत. त्यांनी ज्या कामाला हात लावला त्याचे सोने होते. त्यामुळे विदर्भात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी वनविभागामार्फत एमआयडीसीच्या धरतीवर वनविभागावर आधारित उद्योगांची एमआयडीसी, प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर येथे सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज, सुरक्षा,पायाभूत सुविधा आदी सर्व सुविधा विदर्भात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विदर्भामध्ये गुंतवणूक करणे, ही गुंतवणूकदारांसाठीची सध्याची संधी आहे त्याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांना केले.

मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलरच्या इकॉनोमीमध्ये,नव्या जगाच्या भारतामध्ये आपला विदर्भ दिसायला पाहिजे. यासाठी सगळ्या उद्योजकांनी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष काळे व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button