आळंदी फाटा येथे भर दिवसा तरुणाचा मोबाईल हिसकावला
पिंपरी l प्रतिनिधी
आळंदी फाटा, चाकण येथे तीन चोरट्यांनी एका तरुणाच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल फोन हिसकावला. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी सव्वापाच वाजता घडली.
अंकुश सुहास शेलार (वय 18, रा. चाकण), सागर लालासाहेब धुनगव (वय 20, रा. चाकण) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश आणि सागर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योगेश दिगंबर जाधव (वय 19, रा. वाकी बुद्रुक, ता. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास आळंदी फाटा चाकण येथून पायी चालत जात होते. ते भैरवनाथ स्नॅक्स सेंटरजवळ आले असता एका दुचाकीवरून (एम एच 14 / जे झेंडा 7210) तीन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातून 10 हजार रुपये कीमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. पोलिसांनी दोन चोरट्यांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.