Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

राराज्यातील कुपोषण आणि बालमृत्यूंची संख्या कमी झाल्याचा यंत्रणाचा दावा, मात्र धक्कादायक वास्तव उघड

मुंबईः राज्यातील कुपोषण आणि बालमृत्यूंची संख्या कमी झाल्याचा दावा यंत्रणांकडून सातत्याने केला जात असला, तरीही त्यात तथ्य नसल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मागील १७ महिन्यांमध्ये राज्यात २२ हजार ७५१ बालकांचा मृत्यू झाला. बालकांचे हक्क व अधिकार, आरोग्य या विषयांवर काम करणाऱ्या ‘समर्थन’ संस्थेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत राज्य कुटुंब कल्याण विभागाकडून मागवलेल्या माहितीअंतर्गत हे वास्तव उघड झाले.

राज्य कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यांत राज्यात पाच वर्षांपर्यंतच्या वयोगटात २२ हजार ७५१ मृत्यू झाले. त्यापैकी १९ हजार ६७३ अर्भकमृत्यू असून तीन हजार ७८ बालमृत्यू आहेत. राज्यातील अर्भक व बालमृत्यूंचे प्रमाण हे अप्रगत जिल्ह्यांच्या तुलनेत प्रगत जिल्ह्यांमध्ये जास्त आहे.

मागील १७ महिन्यांत मुंबई व मुंबई उपनगरात एक हजार ८९८, नागपूरमध्ये एक हजार ७४१, औरंगाबादमध्ये एक हजार ३४९, नाशिकमध्ये एक हजार १२७, पुणे येथे एक हजार १८१, अकोला येथे एक हजार ४९, नंदुरबारमध्ये एक हजार २६, तर ठाणे येथे एक हजार १५ बालमृत्यूंची नोंद झाली. नंदुरबार व अकोला हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हे हे राज्यातील प्रगत जिल्हे आहेत. एकूण बालमृत्यूंमध्ये या नऊ जिल्ह्यांचे प्रमाण ४३ टक्के आहे.

कोवळी पानगळ थांबत का नाही?
आरोग्याचा दर्जा सुधारण्यासह कुपोषण व बालमृत्यू कमी व्हावेत, यासाठी १२ योजना राबवल्या जातात. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम होत नसल्याचे बालमृत्यूंचे वाढते प्रमाण अधोरेखित करते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात इतक्या मोठ्या संख्येने बालमृत्यू होणे चिंताजनक आहे. आईला गर्भावस्थेमध्ये मिळणारा आहार, अॅनिमिया, अपुऱ्या दिवसांमधील प्रसूती, आरोग्यसुविधा नसल्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत, कमी वजनाची बालके, अशी विविध कारणे लक्षात घ्यायला हवीत, असे आरोग्य कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी सांगितले.

अभ्यासाची गरज
सर्वात कमी ६४ बालमृत्यू कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मराठवाड्यातील वाशिम जिल्ह्यात ८९, लातूर जिल्ह्यात १२५ बालमृत्यूंची नोंद झाली. या ठिकाणी बालमृत्यूंची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी का आहे, याचाही तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा. प्रत्येक महिन्यामध्ये मुलांचे वजन, उंची, आहार तसेच गर्भवती महिलांचे आरोग्य, संबंधित भागामध्ये होणारा साथींचा प्रादुर्भाव, अशा विविध पातळ्यांवर अभ्यास करण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मूळ कुपोषणात
बालमृत्यू होण्यास वेगवेगळी कारणे असली, तरीही त्याचे मूळ हे कुपोषणात आहे. त्यामुळे कृतिदल स्थापन करून या विषयातील तज्ज्ञ व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश करावा. ग्रामीण भागातील कुपोषण व शहरी भागातील कुपोषणाची विभागणी करून या दोन्ही ठिकाणी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचा अभ्यास करण्याची गरज समर्थन या संस्थेने व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button