breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मुलांचा गळा दाबून खून करत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न

  • पतीच्या अपघाती निधनाच्या विरहातून कृत्य

कराड |

पतीच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाती मृत्यूच्या विरहातून महिलेने आपल्या दोन लहान मुलांचा गळा दाबून खून करत स्वत: विषारी औषध पिऊन तसेच हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कराडच्या रुक्मिणीनगर परिसरात आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी खुनाची घटना उघडकीस आल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली. कराडलगतच्या वारुंजी येथे काल मंगळवारी (दि. २४) सकाळी मावशीसह दोन वर्षांच्या निष्पाप भाच्याचा निर्दयीपणे खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज आईनेच दोन मुलांचा खून करून, स्वत:चीही जीवनयात्रा संपवण्याचा केलेला प्रयत्न समोर आल्याने लोकांमधून संताप आणि  हळहळही व्यक्त होत आहे.

सुजित आवटे यांचे सहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी अनुष्का यांना एकटेपण दाटले होते. आपल्या मुलांना वडिलांची माया, प्रेम मिळत नसल्याबाबत त्या वारंवार दु:ख व्यक्त करीत असत. त्यातूनच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून हर्ष (वय ८) व आदर्श (वय ६) या दोघा मुलांचा गळा दाबून खून केला आणि स्वत: विषारी औषध पिऊन हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असावी. ती आज सकाळी साडेआकराच्या सुमारास उघड झाली.

दुपार होत आली, तरी नातवंड खेळण्यास खाली आले नाहीत म्हणून त्यांची आजी मुलांना हाका मारत घराच्या तिसऱ्या मजल्यावर आली असता, मुले खाटेवर निपचित पडून होती. त्यांच्या अंगावर पांघरूणही होते. त्यांच्या बाजूलाच अनुष्काही पडून होती. यावर आजीने नातवांच्या अंगावरील पांघरून बाजूला करूनही त्यांची हालचाल नसल्याने आजीला संशय येऊन तिने परिसरातील लोकांना सांगितल्यावर त्यांनी या तिघांनाही रुग्णालयात हलवले असता हर्ष व आदर्शचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, अनुष्का अत्यावस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल आहे. अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीत पती सुजितच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नसल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. पतीच्या अपघाती निधनामुळे विम्याची रक्कम मिळाली, तरी आम्ही त्या पैशाचे काय करायचे? असा प्रश्न करून, आमच्या पश्चात घरातील साहित्य गोरगरिबांना वाटावे असे चिठ्ठीत नमूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button