Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भवितव्य टांगणीला!,पालिकेची प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी

 मुंबई | मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यातील महत्त्वाचा टप्पा असलेली प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक, संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पालिकेतील नगरसेवकपदासाठी गुघड्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. त्यातील काहींनाच निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीत कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असेल, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वच पक्षांतील नेते, संभाव्य-इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्येही यामुळे कमालीची धाकधूक, ताण निर्माण झाला आहे.

मुंबई पालिकेत यंदा २३६ प्रभाग असून, सर्वच राजकीय पक्षांमध्ये आरक्षण सोडतीत कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार याची उत्सुकता आहे. प्रत्येक पक्षात सध्या आजी, माजी नगरसेवकांसमवेतच नगरसेवक होण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा असलेल्या कार्यकर्त्यांची फौज मोठ्याप्रमाणात आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून ‘लोकसेवे’त व्यग्र असलेल्या नेते, कार्यकर्ते नेमके आरक्षण सोडतीत त्यांच्या प्रभागात आरक्षण बदलले गेल्यास काय करायचे, या विचाराने व्याकुळ आहेत. सोडतीत नेमके काय होईल, हे त्याचवेळी स्पष्ट होणार असल्याने सगळ्यांनाच धाकधूक वाटत असल्याचे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मुंबई पालिकेची मुदत ७ मार्चला संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारने प्रशासक म्हणून आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे जबाबदारी सोपावली. त्यानंतर पालिका निवडणूक कधी होणार याविषयी सुस्पष्टता नसल्याने बऱ्याच माजी नगरसेवकांनी समाजसेवेची कामे म्यान केली होती. आता निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले तरीही आरक्षण सोडत जाहीर झाल्याशिवाय पुढील कोणतीही धोरणे मांडता येत नसल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. नेमके आपल्याच प्रभागात आरक्षण आल्यास काय करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले. तेव्हा राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील वाढीव नऊ प्रभागांवर अंतिम मोहोर उमटवली. त्यामुळे आता २२७ ऐवजी २३६ प्रभाग झाले आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्याने मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यासाठी पालिकेच्या २४ प्रभागांमध्ये सूचना, हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाचे ६१ प्रभाग आता खुले होणार असल्याने २३६ पैकी ११८ प्रभाग हे महिलांसाठी असतील. अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित ठेवले जाणार असून, त्यापैकी आठ महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग आरक्षित आहेत. त्यातील एक महिलांसाठी आरक्षित आहे. त्यासह २१९ खुल्या प्रभागांपैकी १०९ महिलांसाठी आरक्षित असतील. या आरक्षण सोडतीवर १ ते ६ जूनपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील आणि १३ जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध होईल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button