देशात देशभक्तीचा व्यापार चाललाय; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

Uddhav Thackeray | यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या (१४ सप्टेंबर) होणाऱ्या भारत-पाकिस्तान साखळी फेरी सामन्यावरून राजकीय वाद तापला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला. पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा बळी गेल्याने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणे हे ‘राष्ट्रीय भावनांचा अपमान’ असल्याचे सांगून ठाकरे यांनी सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, की उद्या भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना आहे. भालाफेकीत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्राने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतात खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. हे आमंत्रण त्याने कधी दिले होते, हे माहिती नाही. पण, तो पाकिस्तानी खेळाडू काही आला नाही. यावरून अंधभक्तांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गाठली होती. त्याला यातून किती मनस्ताप झाला असेल, याची मला कल्पनाही करवत नाही. पण, आता अचानक असे काय झाले? ज्या पाकिस्तानबरोबर आपण युद्ध केले, त्यांच्याशी उद्या क्रिकेट सामना खेळणार आहोत.
हेही वाचा : इंग्लंडच्या वादळी फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेची धुलाई; टी-२० मध्ये नवा विक्रम!
भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा आहे. हा देशभक्तीचा व्यापार चालला आहे. यांना व्यापारापुढे देशाचीही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की, तुम्ही हे युद्ध थांबल्याचे जाहीर केले आहे का? जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते आणि लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना हे अंधभक्त पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, त्यांचे आता काय करणार? आणि पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
पहलगाममधील पर्यटकांना धर्म विचारून आणि हिंदू म्हणून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. अशी परिस्थिती असताना, पंतप्रधान आणि भाजपाच्या लेखी हिंदुत्त्वाची काही किंमत आहे की नाही? की त्यांना देश आणि हिंदुत्त्वापेक्षा व्यापार मोठा वाटतो? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. मला आठवते आहे की, जावेद मियाँदाद बाळासाहेबांना भेटायला आला होता. त्यावेळी त्याच्या तोंडावर बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले होते की, हा सगळा फालतूपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही, तोपर्यंत माझ्या देशात क्रिकेट वगैरे होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





