रोनाल्डोचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले; थरारक सामन्यात स्पेनकडून पोर्तुगालचा पराभव!

Cristiano Ronaldo | फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी २०२६ फिफा विश्वचषकाचा शेवट अत्यंत वेदनादायी ठरला आहे. रोनाल्डोचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. आयबेरियन डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत चुरशीच्या उप-उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनने अतिरिक्त वेळेत (Extra Time) गोल करत पोर्तुगालचा १-० असा पराभव केला. या पराभवासोबतच पोर्तुगालचा संघ स्पर्धेबाहेर झाला असून, रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा अत्यंत भावनिक अंत झाला. पराभवानंतर मैदानातच रोनाल्डोला आपले अश्रू अनावर झाले होते.
सामन्यात बदली खेळाडू (Substitute) म्हणून मैदानात आलेल्या स्पेनच्या मायकेल मरीनो याने अतिरिक्त वेळेत केलेला ऐतिहासिक गोल सामन्यात निर्णायक ठरला. तर दुसरीकडे, युवा स्टार लामिन यामालच्या स्पेनने पुढील फेरीत प्रवेश करत विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
संपूर्ण सामन्यात स्पेनने कमालीचा आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाने उत्कृष्ट बचाव करत अनेक गोल कौशल्याने रोखले आणि आपल्या संघाला शेवटपर्यंत सामन्यात टिकवून ठेवले.
हेही वाचा
राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात
सामन्याच्या अगदी शेवटच्या क्षणांमध्ये पोर्तुगालने बरोबरी साधण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. परिस्थिती अशी होती की, पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टा देखील आक्रमणासाठी स्पेनच्या पेनल्टी क्षेत्रात धावून आला होता. मात्र, स्पेनच्या भक्कम बचावफळीने पोर्तुगालला कोणतीही संधी न देता आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नेशन्स लीगच्या पराभवाची परतफेड आणि २०१८ चा वचपा
स्पेन आणि या युवा स्टारसाठी हा विजय विशेष होता. गेल्या वर्षी झालेल्या यूईएफए नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले होते, त्यामुळे स्पेनसाठी ही परतफेडीची उत्तम संधी होती.
विश्वचषकाच्या इतिहासात २०१८ नंतर हे दोन्ही बलाढ्य संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. रशियात झालेल्या त्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रिक करत स्पेनच्या तोंडचा घास हिरावला होता आणि तो सामना ३-३ असा बरोबरीत सुटला होता. यावेळी मात्र स्पेनने जुना हिशोब चुकता केला.
स्टार खेळाडूंमधील महासंग्राम ठरला ऐतिहासिक
या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांच्या मध्यफळीतील (Midfield) स्टार खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. पोर्तुगालकडे ब्रुनो फर्नांडिस, विटिन्हा आणि जोआओ नेव्हेस यांसारखे दमदार खेळाडू मैदानात होते, तर त्यांना टक्कर देण्यासाठी स्पेनने पेद्री, रोड्री आणि दानी ओल्मो यांसारख्या स्टार्सची फळी उतरवली होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी फुटबॉल चाहत्यांना एक थरारक अनुभव दिला, ज्याचा शेवट रोनाल्डोच्या चाहत्यांना भावुक करून गेला.





