टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी
फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

दुबई : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 6 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 254 धावा केल्या आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी तर 2013 नंतरची पहिली वेळ ठरली. टीम इंडियाने या विजयासह इतिहास घडवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
टीम इंडियाने काय केलं?
टीम इंडियाने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. याआधी एकाही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाची 2013 सालीच बरोबरी केली होती. मात्र त्यानंतर आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
रोहितसेनेने दशकाची प्रतिक्षा संपवली
टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांना 2002 साली संयुक्तरित्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर 11 वर्षानंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने 2017 सालीही अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र पाकिस्तानकडून भारताला पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र आता टीम इंडियाने अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
टीम इंडिया तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.