‘टीम इंडिया’ च ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स !
भारताच्या 'फिरकी' ने न्यूझीलंडला अक्षरशः नाचवले !

दुबईः दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रोहित शर्माच्या ‘टीम इंडिया’ने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला आणि ‘चॅम्पियन ट्रॉफी’ वर भारताचे नाव कोरले. संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींना अपेक्षित असणारा हा दिमाखदार विजय नोंदवून भारताने आपले क्रिकेट जगतावरील वर्चस्व कायम राखले आहे.
प्रथम फलंदाजी स्वीकारून न्यूझीलंडने भारतापुढे २५२ धावांचे आव्हान ठेवले, सुरुवातीला ते सोपे वाटत होते. पण, टप्प्याटप्प्याने भारताचे गडी बाद होत गेले आणि शेवटी भारताने चार गडी राखून विजय मिळवला.
न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि मायकल ब्रेसवेलने ठोकलेल्या अर्धशतकांनी त्यांना सावरले. ऐन बहरात असलेल्या भारतीय फिरकीच्या चौकडीने न्यूझीलंडचे सर्व फलंदाज स्थिर होण्यापूर्वीच तंबूत धाडले.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
रो’हिट’ चे हार्ड हीटिंग..
सलग पंधरा वेळा नाणेफेक हरल्यामुळे रोहित शर्माने अनोखा विक्रमच रचला. पण, दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून त्याने आपला मनसुबा दाखवून दिला. रो’हिट’ याला सूर गवसला आणि त्याने उत्तुंग फटकेबाजी केली. त्याला सुरुवातीला शुभमन गिलने खंबीर साथ दिली. आज विराट कोहलीच्या नशिबी अपयश लिहिले असावे, अत्यंत दुर्दैवी पद्धतीने तो बाद झाला.
श्रेयस अय्यरची उत्तुंग फटकेबाजी
विराट बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने काही उत्तुंग षटकार ठोकून भारतीय संघाची विजयाकडील वाटचाल सुरूच ठेवली. शेवटी हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी चांगलाच किल्ला लढवला.
संपूर्ण देशात विजयाचा जल्लोष..
भारताने न्यूझीलंडवर मिळवलेल्या शानदार विजयामुळे संपूर्ण देशात विजयाचा जल्लोष आणि आनंदोत्सव झाला. फटाक्याची जोरदार आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत क्रिकेटप्रेमींनी रोहित विराट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या फोटोच्या मिरवणुका काढल्या. तमाम भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन !
या जबरदस्त विजयामुळे भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी जोरदार अभिनंदन केले आहे. अनेक ठिकाणी लाडू आणि पेढ्यांचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
रोहित शर्माच्या निवृत्तीची जोरदार चर्चा..
ही चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकून देऊन कर्णधार रोहित शर्मा हा निवृत्त होणार असल्याची दिवसभर खेळाडूंमध्ये चर्चा सुरू होती. सलामीला येऊन आज रोहितने कर्णधाराला साजेशी खेळी सुद्धा केली. हल्ली रोहितची जाडी वाढली असून त्याचे ‘रिफ्लेक्सेस’ कमी झाल्याची टीकाही होत होती. पण, आजची रोहित शर्माची फलंदाजी पाहून त्याने निवृत्त होऊ नये, अशीच भावना बहुतेक क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली होती. शेवटी त्याने निवृत्तीची घोषणा केली नसल्याने अवघ्या क्रिकेट प्रेमींनी सुस्कारा टाकला हे नक्की !