पुनावळ्यात नदी स्वच्छता मोहिमेत निष्काळजीपणा
नागरी समस्या: जलपर्णी जाळल्याने धुराचे लोट, नागरिक संतप्त

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पुनावळे (ता. मुळशी) येथील श्री राम मंदिर परिसरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. नदीतील जलपर्णी काढून स्वच्छता करण्यात येत असताना, त्या जलपर्णीची योग्य विल्हेवाट न लावल्याने आणि त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्याला आग लावल्याने संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला. शेजारी असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही धुराचा त्रास झाला. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
माहितीनुसार, नदी स्वच्छतेदरम्यान मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढून ती नदीकिनारी साचवण्यात आली होती. मात्र, ती वेळेवर हटवण्याऐवजी तशीच टाकून दिल्याने ती कुजण्यास सुरुवात झाली. कुजलेल्या जलपर्णीतून दुर्गंधी पसरत असतानाच अज्ञात व्यक्तींनी त्याला आग लावली. परिणामी, दाट धूर आणि धुळीचे लोट संपूर्ण राम मंदिर परिसरात पसरले. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि अस्वस्थता जाणवू लागली.
घटनेच्या वेळी सीनियर फायरमन संभाजी अवतारे, लक्ष्मण बंडगर, वाहन चालक संकेत थोरात, फायरमन अरुण इंगवले तसेच त्यांचे सहकारी विकी घुमे, करण मुळे, संतोष जामदार, प्रशांत जाधव आणि शिंदे काका यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले.

हेही वाचा : टायगरफीस्ट आयडियाथॉन 2026 स्पर्धा : स्टार्टअप संस्कृतीला चालना
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेने स्वच्छता मोहिमेतील नियोजनाचा अभाव आणि जबाबदार अधिकाऱ्यांची निष्काळजी वृत्ती उघड केली आहे. विशेषतः, काढलेल्या जलपर्णीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना ती जागेवरच साचवून ठेवण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. “स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली प्रदूषण वाढवले जात असेल, तर त्याचा काय उपयोग?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रशासनाने तातडीने या भागात पर्यावरणीय तपासणी करून हवा प्रदूषणाचा स्तर मोजावा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणीही होत आहे. या घटनेमुळे पुनावळे परिसरातील स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा : जालिंदर काटे
या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे सचिव जालिंदर काटे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “नदी स्वच्छता मोहिम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जलपर्णी काढून ती तिथेच सडण्यासाठी सोडणे आणि नंतर ती जाळली जाणे, ही गंभीर बाब आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.” पुढे बोलताना त्यांनी प्रशासनाकडे काही ठोस मागण्या केल्या. “या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदी स्वच्छता मोहिमेसाठी ठोस नियोजन, देखरेख आणि काढलेल्या कचऱ्याची तात्काळ वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी,” अशी मागणी त्यांनी केली.





