विराट आणि हेडमध्ये भर मैदानात वाद! सामना संपल्यावर विराटने हस्तांदोलनही टाळलं; व्हिडिओ व्हायरल

SRHvRCB | आयपीएल २०२६ मधील ६७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केले असले, तरी टॉप २ मध्ये जाण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्यात हैदराबादने ५५ धावांनी विजय मिळवला असला, तरी बंगळुरूने नेट रनरेटच्या गणितावर भर देत टॉप २ मधील आपले स्थान पक्के केले. मात्र, या सामन्यात बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद सध्या क्रिकेट जगतात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा विराटने ट्रॅव्हिस हेडशी हस्तांदोलन करणे स्पष्टपणे टाळले असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लाईव्ह सामन्यादरम्यान विराट कोहली ट्रॅव्हिस हेडला काहीतरी बोलताना दिसला होता, ज्याची सुरुवात सामन्याच्या दुसऱ्याच षटकात झाली होती. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजी करत असताना या षटकातील पहिल्या चेंडूवर विराटने फाइन लेगच्या दिशेने एक चौकार मारला. मात्र, हा चौकार बॅटच्या आतल्या भागाला लागून गेला होता. विराटचा हा नशिबाचा चौकार पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने विराटला डिवचण्याचा प्रयत्न करत एक टोमणा मारला. विराटला हेडचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण सजवताना हेड पुन्हा विराटच्या जवळ गेल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
हेही वाचा
इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरातही मोठी वाढ
क्रिकेट वर्तुळात सर्वांनाच माहीत आहे की, विराट कोहलीला जर कोणी मैदानावर उकसवले, तर तो शांत बसत नाही आणि आधी आपल्या बॅटने व नंतर तोंडाने चोख उत्तर देतो. या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. सामन्याच्या चौथ्या षटकात जेव्हा व्यंकटेश अय्यरने हैदराबादच्या शिवांग कुमारच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली, तेव्हा नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या विराटने ट्रॅव्हिस हेडकडे पाहत त्याला काहीतरी बोलून मैदानावरच सडेतोड उत्तर दिले आणि या वादाचे पर्यावसान पुढे थेट हस्तांदोलन टाळण्यात झाले.
हैदराबादचा विजय, पण RCB ‘टॉप २’ मध्ये!
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत २५५ धावांचा प्रचंड डोंगर उभारला होता. बंगळुरूला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान होते. मात्र, आरसीबीने केवळ सामना जिंकण्यामागे न धावता आपले टॉप २ मधील स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी नेट रनरेट कायम राखण्यावर भर दिला. अखेर बंगळुरूने हा सामना ५५ धावांनी गमावला, पण आवश्यक धावसंख्या गाठल्याने त्यांचे टॉप २ मधील स्थान निश्चित झाले आहे. या सामन्यातील खेळ उंचावला असला, तरी विराट आणि हेडमधील हा हाय व्होल्टेज ड्रामा मात्र सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.





