आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपदावर नाव कोरलं
आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर

मुंबई : आयपीएल 2025 स्पर्धेत अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपदावर नाव कोरलं आहे. 17 पर्व आरसीबीचं स्वप्न पूर्ण होता होता राहीलं. या 17 वर्षात तीनदा जेतेपदाची संधी आली होती. पण तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण 18 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळालं. जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. शेवटच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी 29 धावांची गरज होती. विराट कोहलीसह संपूर्ण संघ तणावात होता. शेवटचं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवू मैदानात आला होता. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर विराट कोहलीला विजयाचा विश्वास झाला. सीमेवर क्षेत्ररक्षण करताना त्याचे डोळ्यातून अश्रू आपसूक बाहेर निघाले. गेली 17 वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहात होता ते स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाला. प्रत्येक चेंडूनंतर विजय पक्का होत होता आणि विराट कोहली भावूक होत होता.
विराट कोहली म्हणाला की, ‘हा विजय चाहत्यांसाठी जितका आहे तितकाच तो संघासाठी आहे. मी या संघाला माझे तारुण्य, शौर्य आणि अनुभव दिला आहे. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला, मी शक्य तितके सर्व काही दिले. हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, आम्ही जिंकल्यानंतर भावनेने भरून गेलो. एबीडीने फ्रँचायझीसाठी जे केले ते जबरदस्त आहे, त्याला सांगितले की ‘हे जितके तुमचे आहे तितकेच ते आमचे आहे’. चार वर्षे निवृत्त होऊनही तो फ्रँचायझीमध्ये बहुतेक वेळा पीओटीएम राहिला आहे. तो कप उचलून पोडियमवर येण्यास पात्र आहे. हा विजय अगदी वरच्या दर्जाचा आहे, मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो आहे. माझ्याकडे वेगळे क्षण होते, पण मी त्यांच्यासोबत राहिलो आणि ते माझ्यासोबत. माझे हृदय बंगळुरूसोबत आहे, माझा आत्मा बंगळुरूसोबत आहे. ही एक उच्च-तीव्रतेची स्पर्धा आहे, मला मोठे स्पर्धा आणि क्षण जिंकायचे आहेत. आज रात्री, मी बाळासारखे झोपेन.’
हेही वाचा : पिंपरी पालिका हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणार
विराट कोहलीने या सामन्या महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 35 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यात त्याने 43 धावा ठोकल्या. त्याच्या सावध खेळीमुळे आरसीबीला 190 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्ससमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं. तसेच पंजाबला 184 धावांवर रोखलं. या विजयासह आरसीबीच्या नावावर पहिलं जेतेपद कोरलं गेलं आहे. विराट कोहली आरसीबीसाठी सलग 18 पर्व खेळला आहे. एखाद्या फ्रेंचायझीसाठी सर्वाधिक पर्व खेळण्याचा मान विराट कोहलीला मिळाला. आता 18 व्या पर्वात जेतेपदाची चव चाखली. विराट कोहली आणि 18 या क्रमांकाचं वेगळं असं नातं आहे. विराट कोहली या क्रमांकाच्या जर्सीसह खेळतो. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्येही खेळतो. त्याच्यासाठी आयपीएलचं 18 पर्व लकी ठरलं. अखेर दीर्घ काळापासून असलेलं त्याचं स्वप्न पूर्ण झालं.