ताज्या घडामोडीपुणे

गणितात पास करण्याच्या नावाखाली प्राध्यापकाचा लाखोंचा घोटाळा

प्राध्यापक प्रतिक सातव यांसह तीन अन्य आरोपींना अटक

पुणे : इंजिनिअरिंगचे पहिले वर्षाचे गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांची बोबडी वळते. हीच अडचण हेरून पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना गणितात पास करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्राध्यापकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना गणितात पास करून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याची घटना घडली आहे. प्राध्यापक प्रतिक सातव हा महाविद्यालयात दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या गणिताच्या पेपरनंतर रात्रीच्या वेळी कॉलेजमध्येच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेत होता. ज्या विद्यार्थ्यांना गणित २ या विषयात नापास होण्याची भीती वाटत होती, अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून तो १० ते ५० हजार रुपये उकळायचा. आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून हा गोरखधंदा सुरू होता.

हेही वाचा   :  पिंपरी पालिका हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणार 

चार जणांना अटक
याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘गणित २’ या विषयाच्या लिहिलेल्या उत्तरपत्रिकांचे ६ बंडल, तसेच २ लाख ६ हजार रुपये रोख आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्राध्यापक प्रतिक किसन सातव, आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ
‘गणित २’ या विषयात नापास होण्याची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून आपल्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून १० ते ५० हजार रुपये स्वीकारण्यात येत होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button