भारताची सेमीफायनलची वाट कठीण! फक्त दोन विजय नाहीत पुरेसे; जाणून घ्या समीकरण

T20 World Cup | टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला पहिल्याच सुपर-८ सामन्यात मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल ७६ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताची सुपर-८ मोहिम निराशाजनक ठरली असून उपांत्य फेरीच्या आशांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. क्विंटन डी कॉक, एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन यांना भारताने लवकर बाद करत २० धावांत ३ बाद अशी स्थिती केली. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी आक्रमक भागीदारी करत डाव सावरला आणि संघाला १८५ धावांपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा : JNU मध्ये पुन्हा हिंसाचार; विद्यार्थी संघटना आमने-सामने, अनेक विद्यार्थी जखमी
१८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. पॉवरप्लेमध्येच तीन विकेट्स गेल्यानंतर ५१ धावांत ५ बाद अशी अवस्था झाली. शिवम दुबेने ४२ धावांची झुंजार खेळी केली, पण त्याला साथ न मिळाल्याने भारत १११ धावांत सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट (NRR)ही वजामध्ये गेला आहे.
भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचू शकतो?
आता भारत ‘करो या मरो’ स्थितीत पोहोचला आहे. सुपर-८ मधील उर्वरित दोन्ही सामने जिंकणे भारतासाठी अनिवार्य आहे. भारताचा पुढील सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे, तर अखेरचा सामना २७ फेब्रुवारीला कोलकात्यात वेस्ट इंडिजशी होईल.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय आवश्यक ठरणार आहे, जेणेकरून नेट रनरेट सुधारता येईल. त्याचबरोबर इतर संघांच्या निकालांवरही भारताचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.




