मशाल दौड, सायकलिंग, गडचढाई व मर्दानी खेळांचे दैदिप्यमान सादरीकरण
श्री गणेश व्यायाम मंडळ (ब्रह्मसिंह गुरुकुल)च्या मुलींची ऐतिहासिक कामगिरी

चिखली | शौर्य, परंपरा आणि शिवप्रेम यांचा अनोखा संगम घडवून आणणारा प्रेरणादायी उपक्रम श्री गणेश व्यायाम मंडळ (ब्रह्मसिंह गुरुकुल) यांच्या वतीने यंदा यशस्वीरीत्या पार पडला. सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मशाल दौडीला यंदा सायकलिंगची जोड देत, मध्यरात्री हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, यंदा या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलींनी गडचढाई, मशाल दौड आणि शिवकालीन युद्धकलेचे (मर्दानी खेळ) आठ ठिकाणी प्रभावी सादरीकरण करत समाजासमोर धैर्य, शिस्त आणि पराक्रमाचे जिवंत दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याच्या भावनेतून मध्यरात्री किल्ले तिकोणा ते भक्ती शक्ती चौक हे अंतर या शूर मुलींनी यशस्वीरीत्या पार केले.
थंडीचा कडाका, अंधारातील खडतर वाटा आणि सातत्यपूर्ण श्रम यांवर मात करत मुलींनी दाखवलेली चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या मोहिमेची सुरुवात रात्री ९.३० वाजता झाली असून, सकाळी ७.३० वाजता भक्ती-शक्ती चौक येथे या दौडीचा यशस्वी समारोप झाला.
उपक्रमात सहभागी मुली
आदिश्री काळे (वय ८)
आरोही बनसोडे (वय १२)
रेवा आव्हाड (वय १३)
ध्रुवीता चव्हाण (वय १४)
दीप्ती पाटील (वय १४)
श्वेता लिमन (वय १६)

हेही वाचा : भारताची सेमीफायनलची वाट कठीण! फक्त दोन विजय नाहीत पुरेसे; जाणून घ्या समीकरण
मार्गदर्शन व प्रशिक्षण
मार्गदर्शक : संजय शेलार सर
प्रशिक्षक : प्रफुल्ल प्रधान
सहकारी वर्ग : सानिका माने, कल्पेश धनोकर, गुणवंत इंगळे
आयोजकांच्या माहितीनुसार, हा उपक्रम केवळ सहनशक्ती व शारीरिक क्षमतेचे प्रतीक नसून, शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी गड सर करताना अनुभवलेल्या पराक्रमाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा आहे. इतिहासातील शौर्यगाथा कृतीतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मर्दानी खेळांचे विशेष सादरीकरण (८ ठिकाणी)
विश्व कल्याण स्कूल
गुरु गणेश स्कूल
एस.पी.एम. स्कूल
नवमहाराष्ट्र स्कूल
गुरुवर्य अकादमी स्कूल
डी. वाय. पाटील कॉलेज, ताथवडे
प्रतिभा कॉलेज, आकुर्डी
मॉडर्न हायस्कूल
तसेच लर्निंग कॅम्पस येथे आयोजित कार्यक्रमातही मुलींनी कराटेचे सादरीकरण करत आपली कला आणि आत्मविश्वास दाखवून दिला.
या सर्व मुलींनी परिश्रमपूर्वक गडचढाई व मशाल दौड पूर्ण करून शिवप्रेम, धैर्य आणि संघभावनेचे उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या धाडसी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशा ऐतिहासिक व प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




