एक चाहता सुरक्षेचं कडं तोडून विराट कोहलीकडे पोहोचला
विराट कोहली स्लिपला फिल्डिंग करत होता. तेव्हा त्या चाहत्याने त्याच्या पाया पडला.

दिल्ली : विराट कोहली 13 वर्षानंतर देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळला. शेवटच्या फेरीत रेल्वे विरूद्धच्या सामन्यात दिल्लीकडून मैदानात उतरला. या सामन्यात विराट कोहली काही खास करू शकला नाही. इतर फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीने हा सामना एक डाव आणि 19 धावांनी जिंकला. पण या सामन्याचं प्रमुख आकर्षण होतं विराट कोहली होता. त्याला पाहण्यासाठी स्टेडियम पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. यामुळे विराट कोहलीच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण असं असूनही सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देत काही फॅन्स मैदानात घुसले. सामन्याच्या तिसर्या दिवशी हा प्रकार घडला. तीन चाहते सुरक्षारक्षकांच्या हातावर तुरी देऊन मैदानात घुसले. त्यामुळे मैदानात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. रेल्वेच्या दुसऱ्या डावात हा प्रकार घडला. 18व्या षटकावेळी गौतम गंभीर स्टँडकडून तीन चाहते मध्ये घुसण्यात यशस्वी ठरले. इतकंच काय तर विराट कोहलीकडेही पोहोचले. यावेळी एका चाहत्याने विराट कोहलीने पायांना स्पर्श करत नमस्कार केला. यानंतर तात्काळ सुरक्षारक्षक तिथे पोहोचले आणि त्यांनी तिघांना पकडलं आणि मैदानाबाहेर काढलं. या घटनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्याला 30 जानेवारीला सुरुवात झाली होती. या सामन्याच्या पहिल्या दिवशीही एक चाहता सुरक्षेचं कडं तोडून विराट कोहलीकडे पोहोचला होता. तेव्हा विराट कोहली स्लिपला फिल्डिंग करत होता. तेव्हा त्या चाहत्याने त्याच्या पाया पडला. हा प्रकार सुरु असताना पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या चाहत्याला पकडून स्टेडियमबाहेर काढलं. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता.
रणजी स्पर्धेतील या सामन्यात विराट कोहली फेल गेला. त्याने 15 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून बाद झाला. हिमांशु सांगवानने त्याला क्लिन बोल्ड केलं. रेल्वेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 374 धावांची खेळी केली आणि 133 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडतानाच रेल्वेचा संघ 114 धावांवर गारद झाला. हा सामना दिल्लीने एक डाव आणि 19 धावांनी जिंकला.