ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीजसमस्या सोडवण्यासाठी नगरसेविका कविता भोंगाळे यांचा पुढाकार!

भाजप आमदार महेशदादा लांडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी नवीन डीपी उपलब्ध करणार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भोसरीतील प्रभाग क्रमांक ५ मधील गंगोत्री पार्क, महादेवनगर, सावंतनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर तसेच जयदीप पार्क या भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि अचानक वीज जाण्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे यांनी भाजपा नेते आमदार महेशदादा लांडगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांबाबत आश्वासक भूमिका समोर आली आहे.

सदर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्प, निवासी सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना तसेच घरगुती वीज वापरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत विद्यमान वीज यंत्रणा सक्षम नसल्याने तेथील वितरण ट्रान्सफॉर्मरवर (डी.पी.) अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, लो-व्होल्टेजची समस्या निर्माण होणे आणि अनेकदा तासन्तास वीजपुरवठा विस्कळीत राहणे, अशा समस्या निर्माण होत आहेत.

नगरसेविका कविता भोंगाळे यांनी आमदार लांडगे यांना दिलेल्या निवेदनात या भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तसेच किरकोळ व्यावसायिक, दुकानदार आणि सेवा व्यवसायांनाही वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

याशिवाय वारंवार होणाऱ्या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे घरगुती वीज उपकरणांचे नुकसान होण्याचा धोका वाढला असून अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेविका भोंगाळे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

आमदार महेशदादा लांडगे यांनी नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वाढत्या वीजभाराचा विचार करून सदर परिसरासाठी नवीन डी.पी. मंजूर करण्याबाबत सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे ही प्राथमिकता असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांच्या अपेक्षा…

नगरसेविका कविता भोंगाळे या स्थानिक पातळीवरील विविध नागरी समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून वीजपुरवठ्याच्या प्रश्नासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या भागातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नवीन डी.पी. मंजूर होऊन ती कार्यान्वित झाल्यास गंगोत्री पार्क, महादेवनगर, सावंतनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर आणि जयदीप पार्क भागातील हजारो नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

“गंगोत्री पार्क, महादेवनगर, सावंतनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर आणि जयदीप पार्क या भागातील नागरिक वारंवार होणाऱ्या वीजखंडितता आणि लो-व्होल्टेजच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे. या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी मी आमदार महेशदादा लांडगे यांची भेट घेऊन नवीन डी.पी. मंजूर करण्याची मागणी केली आहे. आमदारांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.”

– कविता भोंगाळे, नगरसेविका, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button