ताज्या घडामोडीमुंबई

राज्यात भोंग्यांबाबत लवकरच निर्णय; दोन दिवसांत नियमावली जारी करणार

मुंबई | प्रतिनिधी

– दोन दिवसांत धोरण ठरवून राज्यभरासाठी अधिसूचना जारी करणार

– मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

– पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

सार्वजनिक आणि धार्मिक स्थळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर अर्थातच भोंगे वापराबाबत मुंबई पोलिस आयुक्तांसह राज्याचे पोलिस महासंचालक मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहेत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील धोरण ठरविण्यात येईल. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यभरासाठी अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली. दरम्यान, भोंग्यांबाबत नियमावली ठरविण्यासाठी आज, मंगळवारी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापुढे सर्वधर्मीय सणांना परवानगी बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे समजते.

मनसे नेते राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. भोंगे उतरवले नाही, तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली. भाजप आणि मनसेच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का, याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे समजते.

भोंग्याच्या प्रश्नावर कोणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही असो, अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे लावू नयेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. भोंगे वापरासंदर्भात न्यायालयाच्या निर्बंधाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिला होता. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, ज्यांना हनुमान चालीसा वाचायची आहे, त्यांनी मंदिरात जाऊन वाचावी.

पोलिसांची डोकेदुखी वाढली

मशिदींवरील भोग्यांमुळे राजकारण तापल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबाबत इशारा दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील धार्मिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरे, संवेदनशील ठिकाणे, प्रसिद्ध प्रार्थनास्थळे यांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मशिदी तसेच इतर प्रार्थनास्थळे आणि सणांना लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शहरांचे पोलिस आयुक्त, अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज, मंगळवारी बैठक होणार असल्याचे कळते. या बैठकीत भोग्यांबाबत न्यायालयाचा आदेश विचारात घेऊन वेगवेगळे पर्याय तपासण्यात येणार आहेत. पोलिसांच्या बैठकीत याबाबत नियमावली तयार करून ती राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे. शासनाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना याआधीच इशारा दिला आहे. सायबर पोलिसांनीदेखील अशा वादग्रस्त आणि धार्मिक वातावरण बिघडविणाऱ्या जवळपास तीन हजार पोस्ट हटविल्या आहेत. त्यामुळे भोंग्यांसंदर्भात पोलिस नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘प्रक्षोभक सभांवर बंदी घाला’

‘केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाशिकमध्ये परवानगी अनिवार्य

नाशिक : नाशिकमध्ये सलोखा कायम राहण्याच्या हेतूने पोलिस आयुक्तांनी पुन्हा पूर्वपरवानगीचा ‘भोंगा’ वाजविला आहे. मशिदींसहित सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य आहे. ३ मेपर्यंत लेखी परवानगी न घेतल्यास कारवाई होणार आहे. मनसेला मशिदींच्या शंभर मीटर अंतरात हनुमान चालिसा पठणास मनाई असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तडीपार करण्याचा इशारा आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button