ताज्या घडामोडीमुंबई

नागपूरकर ले. जन. मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; चौथे मराठी प्रमुख

मुंबई | प्रतिनिधी

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील.

मूळ नागपूरकर असलेले पांडे डिसेंबर १९८२ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (आयएमए) लष्करात अधिकारी झाले. विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते महत्त्वाच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. पूर्व कमांडमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. त्यानंतर १ फेब्रुवारीला त्यांनी लष्कराचे ४३वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते लष्करातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्याने प्रमुख होतील, अशी अटकळ बांधली जात होती. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असून १ मे रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.

सध्याचे लष्करप्रमुखदेखील मराठीच असल्याने सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान पहिल्यांदाच मिळत आहे. याआधी गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान होत आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२पैकी फक्त दहा अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होता आले आहे, हे विशेष.

‘इंजिनीअर्स’ला पहिल्यांदाच संधी

लष्करात ‘लढाऊ आर्म’ व ‘सेवा आर्म’ असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच ‘इंजिनीअर्स’देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच ‘इंजिनीअर्स’ हेदेखील ‘लढाऊ आर्म’ म्हणून गणले जाते. लष्करात आजवर २७पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत ‘इंजिनीअर्स’ना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button