breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

सातारा |

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.

महिला आयोगानेही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून ताब्यात घेतलं. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे नेलं जाणार आहे.

  • नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

  • वाइन विक्रीच्या निर्णयावरुन टीका

“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

  • “उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले. “अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

  • बंडातात्यांचा माफीनामा…

“ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असं बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसंच राज्यभरात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button