breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

भाजपाला धक्का विदर्भातील मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; मुंबईत होणार पक्षप्रवेश

मुंबई |

भाजपाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, १९ जून रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी अधिकृतपणे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी मुंबईतील काँग्रेसच्या नूतनीकरण झालेल्या टिळक भवनाचेही उद्घाटन आहे. त्याच सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. “राजकीय जन्मच काँग्रेसमध्ये झाल्यामुळे परतीचे वेध लागले होते. त्यामुळे पुढील राजकीय भवितव्याचा विचार करता स्वगृही परत जाण्याचा निर्णय घेतला,” असं डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितलं आहे. “काँग्रेस सोडून जाण्याची तेव्हाही इच्छा नव्हती. पण त्यावेळी राजकीय परिस्थितीने तशी कलाटणी घेतल्यामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. भाजपामध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. मनामध्ये कुठलीही कटुता नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न विचारला असता, “सध्या काहीच ठरविलेले नाही. भविष्यात काय संधी मिळते, ते बघू आणि पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल त्याप्रमाणे कार्य करू,” असं त्यांनी सांगितलं. गेल्या अनेक महिन्यांपासून डॉ. देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या गोपनीय भेटीनंतर डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना उमेदवारी नाकारून रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने उमेदवारी बहाल केली होती. देशमुख यांचे तिकीट कापल्याने नाराज झालेले शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी देशमुख यांच्यासमवेत गेले होते. त्यावेळी प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या. त्यामुळे देश-विदेशातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय पुढाऱ्यांचे अमरावती मतदारसंघाकडे लक्ष होते. रावसाहेब शेखावत विरुद्ध डॉ. सुनील देशमुख ही लढत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचे आव्हान त्या वेळी राष्ट्रपती पुत्रापुढे होते व त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पुत्र रावसाहेब शेखावत जवळपास ५००० मतांनी विजयी झाले होते.

सुनील देशमुख हे २००४ साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या होल्डिंग कंपनीचे माजी-उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे सह-अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपानं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button