वारजेत गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाला कोयत्याने मारहाण
पुणे | गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन तिघांनी पकडून कोयत्याने आणि लाकडी बाबूने बेदम मारहाण केली. वारजेच्या रामनगर परिसरातील शिवाजी चौकात 12 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश उर्फ गुड्या पटेकर, चिक्या जगताप आणि आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू रमेश शिंदे या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. यातील आरोपी गणेश उर्फ गुडया पटेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या गाडीचा धक्का आरोपीची चिक्या जगताप याला लागला होता. त्याच कारणावरून आरोपीने फिर्यादीची गाडी भर रस्त्यात अडवली आणि पाठीमागे दडवलेला कोयता काढून त्याच्या डोक्यात मारला. फिर्यादीने हा वार चुकवला. तर इतर आरोपींनी लाकडी बांबूने त्याच्या पाठीवर मारहाण केली.
या सर्व प्रकारानंतर फिर्यादी आणि त्यात परिसरात राहणारा यश चव्हाण हा मुलगा पळून जाऊ लागले. त्यानंतर आरोपी गणेश उर्फ गुड्ड्या त्याने हातातील कोयता यश चव्हाणांच्या डोक्यात मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी मदतीस येणार्या इतर लोकांचा अंगावर जाऊन आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.





