दिल्लीच्या धर्तीवर हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’? वाढत्या प्रदूषणामुळे आयटीयन्सची मागणी

पुणे : दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्याने सरकारी आणि खासगी कार्यालयांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची मुभा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील प्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याने येथील कर्मचाऱ्यांनाही घरून काम देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे परिसरात हिंजवडी आयटी पार्कमध्ये प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांकाने तीनशेची पातळी ओलांडली असून, हवेची गुणवत्ता अतिखराब पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीतील प्रदूषण वाढल्यानंतर तेथील सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालयांतील ५० टक्के मनुष्यबळाला घरून काम देणे बंधनकारक केले. याचे पालन न करणाऱ्या कार्यालयांवर कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे. आता हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या प्रदूषणामुळे येथील आयटी कर्मचाऱ्यांकडून घरून काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी हिंजवडी आयटी पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी घरून काम देण्याची मागणी केली होती.
याबाबत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज महाराष्ट्रचे अध्यक्ष पवनजित माने म्हणाले की, आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनियोजित पद्धतीने सुरू असलेल्या विकासामुळे हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिल्यास रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. आयटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष कार्यालय आणि घरून काम अशा संमिश्र पद्धतीचा अवलंब कंपन्यांनी करायला हवा. याचवेळी शासकीय यंत्रणांनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी आणि जलद उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – वाढत्या पर्यटनाचा नागरी सुविधांवर ताण, रायगड जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था कोलमडली
याविषयी हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसुरे म्हणाले की, थंडीच्या दिवसात इतर भागांप्रमाणेच हिंजवडी आयटी पार्कमधील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. प्रदूषणाचा त्रास हा स्थानिक रहिवाशांना जास्त होत आहे. याला मुख्यतः या भागात होत असलेले मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे २४ तास सुरू असलेले काम आणि रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प कारणीभूत आहेत. तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषणही त्यात भर घालत आहे. त्यामुळे बांधकामावर नियंत्रण आणून प्रदूषण नियमांचे पालन आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. सध्या तातडीने अनधिकृत आरएमसी प्रकल्प बंद करणे आणि कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देणे आवश्यक बनले आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे आरएमसी प्रकल्पही या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील चार विकासकांना प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी नुकत्याच नोटिसा बजावल्या आहेत. याचवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांची तपासणी सुरू केली असून, प्रदूषण करणारे प्रकल्प बंद करण्याची कारवाई केली जात आहे.




