Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘महिलांना प्रोत्साहन, शक्ती देण्यासह सन्मानही मिळण्याची गरज’; आमदार पंकजा मुंडे

पुणे : “महिला कुटुंब सावरण्यात हातभार लावते. महिलेने केवळ घर सांभाळावे आणि पुरुषांनी बाहेर कमवावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. तिच्या अंगी कलाकुसर, सचोटी, प्रामाणिकता, जिद्द, नीटनेटकेपणा असतो. एखाद्या गोष्टीसाठी आपण महिलांना प्रोत्साहन देतो; शक्ती देतो. मात्र, त्यांना शक्तीसोबत सन्मानही मिळाला, तर त्या विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठतात,” असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे’ उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ‘ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट’च्या संचालक शीतल आगाशे, ‘एमएसएमई’चे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, जयंत भावे आदी उपस्थित होते.

गोल्डन लीफ लॉन्स, म्हात्रे पुलाजवळ, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे येथे हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता. ६) सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. वर्षा भिसे, केतकी तोरणे, रुपाली देसाई, गायत्री अकोलकर जोशी, पूजा किणीकर, अंजली रांजेकर, शिल्पा देशपांडे, योगिता जोग यांना ‘यशस्वी उद्योजिका’ पुरस्काराने मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हँडलूम साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, ज्वेलरी, बॅग्स, कॉस्मेटिक्स, खाद्यपदार्थ असे वैविध्यपूर्ण स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत.

हेही वाचा     –      नेवाळे वस्ती चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात! 

पंकजा मुंडे म्हणाल्या, “जोवर महिला आर्थिक कणा बनणार नाही, तोवर तिला उचित सन्मान मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. ग्रामविकास व महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम करताना महिलांसाठी अनेक चांगली कामे करता आली, याचे समाधान आहे. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षम होत आहे. शहरातही असे प्रयोग सुरू आहेत. ग्रामीण भागात कर्जफेड करणाऱ्या महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते, शहरी भागातही अशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेन. ‘लोकल टू ग्लोबल’ अधिक प्रभावीपणे अंमलात आणले पाहिजे. महिलेचा प्रतिभेचा सन्मान व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत.”

प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी म्हणाल्या, “महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ देण्याचा उद्देश यामागे आहे. उद्योजिकांची वीण घट्ट करणारा हा ‘धागा’ आहे. उद्योजिका महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासह उद्योजकता विकास कार्यशाळा, योजनांची माहिती, व्यवसायाचे व्यवस्थापन, सोशल मीडिया मार्केटिंग आदी गोष्टींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या प्रदर्शनात १०० हुन अधिक नावीन्यपूर्ण स्टॉल आहेत.”

शीतल आगाशे यांनी महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून उद्योग करतात, हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सातत्य आणि चिकाटीने काम करत आशावादी राहून स्वतःवर विश्वास ठेवत ध्येय साकार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. साखर उद्योगात महिलांसाठी अनेक संधी आहेत, त्याची माहिती घेऊन उद्योग सुरु करावेत, असे चारुदत्त देशपांडे म्हणाले.

मिलिंद बारापात्रे यांनी महिला उद्योजकांसाठी एमएसएमई मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सांगितले. या महिलांना आंतरराष्ट्रीय मार्केट मिळावे, त्यांची उत्पादने निर्यात व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्योग करणाऱ्या प्रत्येक महिलांनी उद्यम नोंदणी करून घ्यावी, असे अभय दफ्तरदार यांनी नमूद केले.

प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button