Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ! एकाच हंगामात ५ मोठे पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू

Vaibhav Suryavanshi | आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामावर राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या विक्रमी फलंदाजीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वैभवने अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढले आणि दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी वैभव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. या स्पर्धेच्या शानदार समारोप समारंभात जेव्हा पुरस्कारांची घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये एकामागून एक फक्त वैभव सूर्यवंशीच्याच नावाचा जयघोष ऐकू येत होता. त्याने या पुरस्कार सोहळ्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत एकाच आयपीएल हंगामात पाच वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा इतिहासातील पहिला खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला.

या हंगामात सर्वाधिक ७७६ धावा फटकावून अव्वल स्थान राखल्याबद्दल वैभवला मानाची ‘ऑरेंज कॅप’ आणि १० लाख रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेतील त्याच्या उत्कृष्ट आणि अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला १५ लाख रुपये आणि ‘स्पर्धेतील मौल्यवान खेळाडू’ (मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर) या सर्वोच्च ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. त्याच्यातील अफाट गुणवत्ता पाहता त्याला ‘सीझनचा उदयोन्मुख खेळाडू’ (इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन) म्हणूनही गौरविण्यात आले, ज्यासाठी त्याला १० लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. एवढेच नव्हे तर संपूर्ण हंगामात सर्वाधिक ७२ गगनचुंबी षटकार मारण्याचा पराक्रम केल्याबद्दल त्याला ‘सुपर सिक्स अवॉर्ड’ ट्रॉफी आणि १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. संपूर्ण सीझनमध्ये गोलंदाजांचा धुव्वा उडवत सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा केल्याबद्दल त्याला ‘सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन’ म्हणून घोषित करून ब्रँड न्यू टाटा सिएरा कार भेट देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या हंगामातही ‘सुपर स्ट्राईकर’ ठरलेल्या वैभवला टाटा कर्व्ह कार मिळाली होती.

हेही वाचा

स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा; महापौर रवि लांडगे

वैभव सूर्यवंशीच्या या मोसमातील एकूण कमाईचा आकडा पाहिला तर तो थक्क करणारा आहे. या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने त्याला त्याच्या पूर्वीच्याच १.१० कोटी रुपयांच्या सॅलरीवर संघात कायम ठेवले होते. आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूला प्रति सामना ७.५ लाख रुपये मिळतात, त्यानुसार राजस्थानसाठी १६ सामने खेळून वैभवने १.२० कोटी रुपये कमावले. याशिवाय सीझनच्या शेवटी मिळालेल्या पाच मोठ्या पुरस्कारांमधून त्याला ५५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच संपूर्ण स्पर्धेत त्याने तीन वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला, ज्यातून त्याला प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे १५ लाख रुपये मिळाले. म्हणजेच या एकाच आयपीएल सीझनमधून वैभवची एकूण कमाई ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

वैभवने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-२० क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या हंगामात एकूण ७२ षटकार ठोकून त्याने महान फलंदाज ख्रिस गेलचा एकाच हंगामात ५९ षटकार मारण्याचा जुना विक्रम मोडीत काढला आणि आयपीएलच्या इतिहासात नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. तो आता एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा ‘अनकॅप्ड’ खेळाडू ठरला आहे. यासोबतच सर्वात कमी चेंडूंमध्ये १ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज ठरला असून त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक संपूर्ण क्रिकेट जगतातून होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button