Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय लष्कराची दुसऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’साठी तयारी सुरू; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

Operation Sindoor 2.0 | “देशासमोर जर ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ ची वेळ आली, तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपली भूदल, नौदल आणि वायूदल ही तिन्ही सैन्यदले पूर्णपणे सज्ज आहेत,” अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी दिली. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) ऐतिहासिक १५० व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाप्रसंगी (Passing Out Parade) मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या संरक्षण सज्जतेवर आणि भविष्यातील युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर महत्त्वपूर्ण भाष्य केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सद्यस्थितीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही पूर्णपणे संपलेले नाही, तर सध्या केवळ युद्धजन्य परिस्थिती तात्पुरती थांबली आहे. जर ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ ची परिस्थिती निर्माण झालीच, तर त्यासाठी तिन्ही दले अत्यंत प्रभावीपणे तयारी करत आहेत. सध्या आमचा मुख्य भर तिन्ही दलांमधील अंतर्गत समन्वय वाढवण्यावर आहे.”

सैन्यदलांच्या आधुनिकीकरणावर बोलताना जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन वर्षांत भारतीय सैन्यात ‘थिएटरलायझेशन’ (एकात्मिक युद्ध कमांड) प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसेल. भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलत असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, “पुढील युद्ध हे केवळ जमीन, पाणी किंवा आकाशापुरते मर्यादित नसेल. आताच्या आणि भविष्यातील युद्धात अंतराळ (Space), सायबर (Cyber) आणि कॉग्नेटिव्ह (मानसिक/बौद्धिक) क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय लष्कर स्वतःला याच आधुनिक युद्धासाठी सज्ज करत आहे.”

हेही वाचा

पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी

माहिती युद्धात देशवासीयांचा विश्वास महत्त्वाचा

माहिती युद्ध म्हणजेच ‘इन्फर्मेशन वॉरफेअर’वर बोलताना लष्करप्रमुखांनी देशवासीयांच्या एकजुटीला आणि विश्वासाला सर्वाधिक महत्त्व दिले. “विजय हा नेहमी मनात असतो, केवळ रणभूमीवर नाही. माहिती युद्ध तेव्हाच यशस्वी होते जेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो आणि अधिकृत माहिती देणाऱ्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवतो. जर देशात असा परस्परांवर विश्वास असेल, तर विजय नेहमी आपलाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भावी अधिकाऱ्यांना आवाहन

एनडीएच्या ऐतिहासिक १५० व्या तुकडीच्या कॅडेट्सना संबोधित करताना लष्करप्रमुख म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतावर होणाऱ्या कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला आपण कसे चोख उत्तर देतो, याचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. एनडीएतून उत्तीर्ण होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी हाच उच्च दर्जा आणि शौर्याची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. या दिमाखदार सोहळ्यात लष्करप्रमुखांनी कॅडेट्सच्या अंतिम संचलनाचे निरीक्षण केले आणि चमकदार कामगिरी करणाऱ्यांना पदके प्रदान केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button