पुण्यात दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पोहचली लाखावर

पुणे : जुलैमध्ये दैनंदिन प्रवासी संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला दररोजच्या वाहतूक कोंडीतून मेट्रोचा प्रवास पुणेकरांसाठी दिलासादायक ठरत आहे. जुलै महिन्यात मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. १ जुलै ते ३१ जुलै २०२४ या काळात सुमारे ३१,२०,२९३ प्रवाशांनी प्रवास केला असून दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १,०६,१०१ इतकी राहिली.
या काळात मेट्रोला ४,९८,०४,८१७ रुपये इतके उत्पन्न मिळाले. एकूण प्रवासी संख्येपैकी १०,७०,६५५ प्रवाशांनी पीसीएमसी मेट्रो स्थानक ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक (मार्गिका-१) यावर प्रवास केला व २०,४९,६३८ प्रवाशांनी वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक (मार्गीका-२) यावर प्रवास केला.
वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेची प्रवासी संख्या पीसीएमसी मेट्रो स्थानक ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक या मार्गापेक्षा जास्त आहे असे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा – पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले..
पुणे मेट्रोच्या एक पुणे कार्डलादेखील प्रवाशांची पसंती लाभली आहे. आत्तापर्यंत ५३,०२५ कार्ड विकले गेले असून त्यापैकी ११,६४६ हे विद्यार्थी कार्ड आहेत. पुणे मेट्रोच्या विद्यार्थी पासवर प्रवासी भाड्यामध्ये ३० टक्के सवलत असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हे कार्ड वापरत असल्याचे महामेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे.
पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमानाने सध्या १३ मार्गांवर फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या दैनंदिन १०,००० पेक्षा जास्त प्रवास ही फिडर सेवा वापरत असून रामवाडी स्थानक ते विमानतळ या फिडर बस ४०० पेक्षा अधिक प्रवासी वापरत आहेत.
तर नुकतीच सुरू केलेली रामवाडी मेट्रो स्थानक ते ईआॅन आयटी पार्क या फिडर बससेवेचा लाभ प्रतिदिन १००० पेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. मेट्रो व पीएमपीएमएल अधिकाधिक मार्गावर फिडर बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.