महाराष्ट्रात पुढील चार दिवस हवामान विभागाचा पावसाचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता : होसाळीकर

मुंबई : महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.
होसाळीकर यांनी ट्विट करून 1 ते 4 ऑगस्टचा हवामान अंदाज दिला आहे. यानुसार काही चार दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तसेच विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, नाशिक, पालघर, ठाण्यासह विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना शुक्रवारी यलो अलर्ट आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना शनिवारी 3 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. तर नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालनासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी 4 ऑगस्टला रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह पुणे, सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.