पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले..

पुणे | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली. तसेच, त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. न्यायालयात आपली बाजू वकिलांमार्फत मांडत असताना पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यावरून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, पूजा खेडकर या पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात ३ जून ते १४ जून या कालावधीसाठीच आल्या होत्या. या कालावधीत मी केवळ तीन वेळाच त्यांना भेटलो. तेही माझे इतर अधिकारी आणि वकीलही समोर असताना. १४ जून नंतर त्यांची रवानगी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली.
हेही वाचा – ..तर पुढचा मुख्यमंत्री मीच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान
पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांनी छळाची कोणतीही तक्रार केली नाही. मी राज्य सरकारकडे त्यांची तक्रार केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल त्यांनीही सरकारला पत्र लिहिले होते. त्या पत्रातही त्यांनी छळाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण जेव्हा त्यांची वाशिमला बदली झाली. तेव्हाच त्यांना लैंगिक छळाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तिथून छळाची तक्रार दाखल केली. मला वाटतं हे त्यांना नंतर सुचलेले आहे, असं सुहास दिवसे म्हणाले.