रेशनकार्ड प्रणाली सुधारण्याची सूचना

पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाची ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली अर्थात रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टममध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ही यंत्रणा ठप्प होते. यामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी) सूचना दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये सांगितले.
रेशनकार्डसंबधीचे राज्यातील सर्व कामकाज ठप्प अशा मथळयाखाली वृत्त प्रभातने दि.14 जानेवारी 2025ला प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भातील प्रश्न राज्यातील अनेक आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ही आॉनलाइन यंत्रणा सुरळीत करण्याची लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – पीएमआरडीए प्रदर्शन केंद्राच्या जागेत उभा राहणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा
रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली ही केंद्र शासनाच्या एनआयसी क्लाउंडवर स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरु असल्याने ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरण व शिधापत्रिकासंबधित आॉनलाइन कामकाज करताना तांत्रिक अडचणी आल्या.
तसेच, केंद्र शासनाच्या आधार प्रणालीमध्ये देशपातळीवर तांत्रिक समस्या असल्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी आल्या. सद्यस्थितीत डेटा क्लाउडवर स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.