एसटी महामंडळात आयपीएस दर्जाचा सुरक्षारक्षक

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेमुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सुरक्षिततेबाबत पुन्हा हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यासह एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी (दि. १) आढावा बैठक घेतली. या वेळी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांसह एसटी, पोलीस आणि आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येणार असून, पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे, असे सांगत माधुरी मिसाळ म्हणाल्या, की महिला सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे, त्या तत्काळ करणार आहे. महिलांना निर्भयपणे प्रवास करता यावा, त्यांना सुरक्षिततेची हमी मिळावी व सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक लाभ घेता घ्यावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. या प्रकरणातील चौकशीत जे कोणी कर्मचारी, अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने आणलेल्या स्क्रॅप पॉलिसीनुसार ज्या बसेस स्क्रॅप करण्याची गरज आहे, त्या सर्व आगारांतील बसेस येत्या १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार आहे, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बैठकीत दिली.
काही महत्त्वाचे मुद्दे
– एसटी बसस्थानकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष
– राज्यभरात तक्रार नोंदविण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक
– खासगी बस चालकांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना
– सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणार
– सुरक्षारक्षकांमध्ये महिला सुरक्षारक्षकांचा समावेश