‘पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलै पर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलै २०२५ पर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, विजय शिवतारे, राहूल कुल, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
हेही वाचा – शिवसेना उबाठाचे सर्व खासदार मातोश्रीवर; कोणी कुठेही जाणार नसल्याचा केला दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील शेती सणसर जोड कालव्यावर अवलंबून आहे. त्यासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून तारतम्याने कामे पूर्ण करा, पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करा. नवीन मुठा उजवा कालवा पहिले आवर्तन कालावधी ६० ऐवजी ५५ दिवस व दुसरे आवर्तन दौंड नगरपालिका व इतर पिण्याच्या पाण्यासाठी ३८ दिवसांऐवजी ४५ दिवस करावे, जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून चांगल्या प्रतीची पाईपलाईन करा, कंत्राटदारांनी कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल. जनाई शिरसाई योजनेच्या कामासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.