Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वज्रगडावर सापडली आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची दुर्मिळ पाषाण मूर्ती

पुरंदर-वज्रगड परिसरातील ऐतिहासिक संशोधन मोहिमेचा यशस्वी निष्कर्ष

पुरंदर । विजयकुमार हरिश्चंद्रे । इंग्रज सत्तेला हादरवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला आचरणात आणणारे आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचे अस्तित्व अधोरेखित करणारी दुर्मिळ पाषाण मूर्ती वज्रगड किल्ल्यावर सापडल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दुर्मीळ मूर्तीचा शोध अखिल रामोशी समाज ऐतिहासिक संशोधन वर्गामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान लागला. उमाजीराजे नाईक यांच्यावर अभ्यास करणारे इतिहास अभ्यासक व्याख्याते सागर चव्हाण यांनी या संशोधन मोहिमेची माहिती दिली. मोहिमेच्या यशस्वी कार्यवाहीत संदिप चव्हाण, गणेश मदने, प्रवीण चव्हाण, निखिल जगदाळे, पांडुरंग गाडेकर, ऋषिकेश चव्हाण आणि संग्राम बाहू यांचा मोलाचा सहभाग होता.

वज्रगडाचा परिसर दाट जंगलांनी वेढलेला असून, अत्यंत दुर्गम अशा भुभागामध्ये ही मूर्ती सापडली. यापूर्वी किल्ल्यावर उमाजीराजे तालीम, मारुती मंदिर अशी काही ठळक ओळख पटवणारी स्थळे असल्याचेही नोंदले गेले आहे. इतिहास सांगतो की, वज्रगड आणि पुरंदरच्या मध्ये असलेल्या भैरवखिंडीमुळे या किल्ल्याला ‘वज्रगड’ हे नाव प्राप्त झाले. आदिलशाही आणि निजामशाहीसारख्या सत्तांशी झुंज दिलेल्या या किल्ल्याचा पराक्रमी इतिहास आहे.

राजे उमाजी नाईक यांचा न्यायनिवाडा दरबार वज्रगडाच्या पायथ्याशी भरत असे. पंचक्रोशीतील माता-भगिनी या दरबारात न्यायासाठी येत असत. स्त्री सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या आणि न्यायप्रिय अशा उमाजी राजेंचा लौकिक दूरदूरपर्यंत पसरला होता. २२ जुलै १८२६ रोजी जयाद्रीच्या कडेपठारावर खंडोबा देवाच्या साक्षीने उमाजीराजांचा राज्याभिषेक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या उमाजी राजेंनी स्वतःची गुप्तहेर यंत्रणा उभारली होती. गरीब, शोषित, दिनदुबळ्यांचे अश्रू पुसणारा राजा म्हणून त्यांनी आपल्या क्रांतिकारी बंडाची सुरुवात केली.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना ‘भारतीय रॉबिनहूड’ अशी उपमा दिली होती. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या उमाजीराजे नाईक यांची मूर्ती वज्रगडावर सापडल्यामुळे त्यांच्या कार्याचा व इतिहासाचा नव्याने मागोवा घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही ऐतिहासिक शोधमोहीम भविष्यातील संशोधनासाठी नवे दालन उघडून देणारी ठरू शकते, असा विश्वास अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इतिहासाच्या नव्या पाऊलखुणा…

वज्रगडावर सापडलेली उमाजीराजे नाईक यांची पाषाण मूर्ती ही केवळ एक पुरातत्वीय शोध न राहता, ती त्यांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष देणारी ठळक खूण ठरते. स्वराज्याची तळमळ अंगी बाणवलेला, गोरगरिबांचा कैवारी, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि स्त्री-सुरक्षेसाठी कठोर नियम करणारा राजा म्हणून उमाजीराजे यांचे कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. ब्रिटिश सत्तेविरोधात बंड पुकारताना त्यांनी स्थापन केलेली गुप्तहेर यंत्रणा, स्थानिक जनतेशी असलेला थेट संपर्क, आणि नैतिकतेवर आधारित प्रशासन या गोष्टी त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. अशा क्रांतिकारकाच्या जीवनातील वास्तू, स्मृती व मूर्ती आजही शोध मोहिमेत सापडत असतील, तर इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि सरकारने अशा ठिकाणी संरक्षक विकास आराखडे राबविणे आवश्यक ठरते. उमाजीराजे नाईक यांचे कार्य केवळ रामोशी समाजापुरते मर्यादित न राहता, ते संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान असावे, अशी आवश्यकता आजच्या पिढीने ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button