भुलेश्वरात दर्शन घडतेय ‘विनायकी’चे! : शिल्प अभ्यासकांसाठी महत्त्वाचे केंद्र!
गणेशोत्सव विशेष: स्त्रीरूपातील श्रीगणेशाचं दुर्मिळ आणि अद्भुत रूप
पुरंदर । विजयकुमार हरिश्चंद्रे । महाराष्ट्राच्या संस्कृतीत गणेशपूजेचं विशेष स्थान आहे, परंतु जयाद्री खोऱ्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या प्राचीन भुलेश्वर मंदिरात आजही दर्शन घडतंय एका अद्वितीय आणि दुर्मिळ स्वरूपाचं — स्त्रीरूपी श्री गणेश, ज्याला “विनायकी” म्हणून ओळखलं जातं. गणेशाचं हे स्त्री रूप शिल्पस्वरूपात फारच दुर्मिळ आहे. महाराष्ट्रात केवळ मोजक्या प्राचीन स्थळी अशा मूर्ती आढळतात — त्यातील भुलेश्वरचं स्थान विशेष आहे. सप्तमातृका शिल्प समूहात वैनायकीचं (स्त्री गणेश) अस्तित्व स्पष्टपणे दिसून येतं. पद्मासनात बसलेली ही वैनायकी शिल्पमूर्ती सालंकृत असून तिच्या पायाशी मूषक हे वाहन कोरलेलं आहे, जे गणेशाची ओळख पटवून देतं.
शिल्पशास्त्र आणि पुराणांनुसार, वैनायकी या सप्तमातृकांपैकी एक मानली गेली असून तिचा उल्लेख स्कंद पुराण व देवीसहस्रनामात “विनायकी”, “लंबोधरी” आणि “गणेश्वरी” अशा विशेषणांनी आढळतो. गुप्तकालीन आणि मध्ययुगीन शक्तीपूजन परंपरेत वैनायकीचं महत्व लक्षणीय होतं. ओरिसा, त्रिपुरा आणि संभाजीनगरच्या वेरूळ लेणींप्रमाणे भुलेश्वरही शिल्पशैलीचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं. मंदिराच्या भिंतींवर कोरलेली कुंभ, कमळ, देवी-देवतांचे युद्ध प्रसंग, रामायण-महाभारतातील दृष्यपट, वन्यजीव व पक्ष्यांची शिल्पं हे येथील वैशिष्ट्य आहे.
भुलेश्वर मंदिर आज केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते भारतीय आणि विदेशी शिल्प अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे. ही सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संपत्ती महाराष्ट्राच्या प्राचीन समृद्धतेचं प्रतीक आहे आणि गणेशाच्या स्त्री रूपातल्या या वैनायकीचं दर्शन भक्तांसाठी एक दुर्लभ आध्यात्मिक अनुभव आहे.
‘वैनायकी’ स्वरूप हे त्या समतेचं आणि समग्रतेचं प्रतिक…
भुलेश्वरातील वैनायकी हे शिल्प स्पष्टपणे दर्शवतं की, आपली प्राचीन संस्कृती स्त्री-पुरुष रूपांमध्ये देवत्वाचा भेद करत नव्हती. आज आपण ज्या देवतांना एकल रूपात ओळखतो, त्या अनेकदा दैवी शक्तींच्या युग्म स्वरूपात होत्या – शिवशक्ती, लक्ष्मीनारायण यांसारख्या. गणेशाचंही वैनायकी स्वरूप हे त्या समतेचं आणि समग्रतेचं प्रतीक आहे. वैनायकी शिल्प म्हणजे केवळ मूर्ती नाही – ती आहे स्त्रीशक्तीच्या गणेशत्वाशी झालेल्या एकात्मतेची साक्ष. त्याचं वाहन मूषक असणं, चार हातांत आयुधं असणं, आणि एकूण स्वरूपाने गणेशाशी साम्य असणं हे दाखवून देतं की देवीत्व केवळ लिंगावर आधारलेलं नाही, तर ते तत्त्व आहे – बुद्धी, शक्ती आणि करुणेचं. आजच्या काळात, जेव्हा स्त्रीसमानतेवर चर्चा केली जाते, तेव्हा अशा विस्मरणात गेलेल्या शिल्पांच्या आणि संकल्पनांच्या आठवणी आपल्याला आपल्या मूळ तत्त्वज्ञानाकडे परत नेतात. सांस्कृतिक स्मृती आणि ऐतिहासिक ज्ञान जपणं हे केवळ पुरातत्त्वाचा भाग नाही, तर एक सामाजिक जबाबदारी आहे.






