मुंबईच्या दमदार विजयाने गुणतालिकेत उलथापालथ; तीन संघांना मोठा धक्का

IPL 2026 | आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी प्रभावी विजय मिळवत पराभवाच्या मालिकेला अखेर पूर्णविराम दिला. या विजयामुळे तळाशी असलेला मुंबईचा संघ थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला असून स्पर्धेतील स्थान पुन्हा मजबूत केले आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवल्यानंतर मुंबईला सलग पराभवांचा सामना करावा लागला होता. मात्र गुजरातविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे संघाची गाडी पुन्हा रुळावर आल्याचे चित्र दिसून आले.
आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा दबदबा कायम आहे. पंजाबने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी ८ गुणांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. इशान किशनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी ६ गुण मिळवले असले तरी नेट रनरेट कमी असल्याने त्यांना टॉप-४ मध्ये प्रवेश करता आलेला नाही.
हेही वाचा : बुधवारपर्यंत करार झाला नाही तर बॉम्बस्फोट होतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
मुंबईच्या विजयामुळे तीन संघांना धक्का
दुसऱ्या विजयासह मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी पोहोचल्याने चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना मोठा फटका बसला आहे. या तिन्ही संघांचे गुण सध्या मुंबईपेक्षा कमी आहेत.
आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना; टॉप-४ साठी संधी
स्पर्धेतील पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत ३-३ सामने जिंकून ६-६ गुण मिळवले आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ ८ गुणांवर पोहोचणार असून टॉप-४ मध्ये प्रवेश करण्याची महत्त्वाची संधी निर्माण होणार आहे.





