अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली विशेष रेल्वे
पुणे : दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून राजधानी दिल्लीपर्यंत आणि परतण्यासाठी दिल्लीहून पुण्यापर्यंत विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
ही विशेष रेल्वे गाडी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्याहून (दुपार/संध्याकाळ) सुटेल, तर दिल्लीहून परतीचा प्रवास 23 फेब्रुवारीला असेल. या गाडीत 20 डब्यांचा समावेश असून त्यात स्लीपर क्लास व पॅन्ट्री कोचदेखील असतील.रेल्वे बोर्डाने ही गाडी चालवण्यासाठी तांत्रिक व व्यावसायिक शक्यता तपासल्यानंतर अंतिम मान्यता दिली आहे. या गाडीचे आरक्षण प्रक्रिया आणि विशेष ट्रेनसाठी FTR बुकिंग मंजूर करण्यात आले आहे.
हेही वाचा – रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिली सव्वा कोटींची ‘वर्कऑर्डर’
खासदार मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे साहित्यप्रेमींसाठी ही विशेष भेट ठरली असून साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक क्षणांना उपस्थित राहण्यासाठी ही मोठी सोय ठरणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी, अशी विनंती रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे केली असता आपली मागणी मान्य झाली असून पुणे ते नवी दिल्ली आणि नवी दिल्ली ते पुणे या प्रवासासाठी विशेष रेल्वे धावणार आहे.