बीडचा बाहुबली !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना झाला. सर्वत्र प्रचंड गदारोळ सुरू आहे. पण, या हत्याकांडाचा गुंता सुटत नाही, दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याच्यासह बहुतेक सर्व आरोपींना अटक झाली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. पण, शेवटी वाल्मीक कराडला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाचे बोट केले जात आहे.
आरोपी कितीही मोठा असेल, त्याला आणि त्याची पाठराखण करणाऱ्याला कठोर शासन करण्याचे निर्देश आणि सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्या दृष्टीने सूत्रेही हलत आहेत. तपास यंत्रणांवर रोजच दबाव वाढत आहे आणि साहजिकच सरकार सुद्धा दबावाखाली आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये निघणारे जनआक्रोश मोर्चे शांत व्हायचे असतील, तर लवकरात लवकर हा खटला फास्टट्रॅक मध्ये अतिशय पारदर्शकपणे चालवावा आणि आरोपींना कठोर शासन व्हावे हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा शक्य
कदाचित, त्यामुळेच असे वाटून जाते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन वातावरण काहीसे हलके करण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार असे दिसते. धनंजय मुंडे सत्तेवर असल्यामुळे वाल्मीक कराडच्या टोळक्याची चौकशी करण्यात तपास यंत्रणा हलगर्जीपणा करत आहेत, हा आरोप काहीसा सौम्य होऊ शकेल आणि वातावरणही निवळण्यास मदत होईल.
वाल्मीक कराडकडे पैशाचा खजिना
या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते, हे आता लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते, त्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापासून अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यापर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते स्थानिक आमदार सुरेश धस यांच्यापर्यंत सर्वांशीच कराडचे लागेबांधे होते, हे सिद्ध झालेले आहे. जिव्हाळ्याच्या संबंधांमध्येच काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून कदाचित भाजपाचे आमदार सुरेश धस हे रोज वाल्मीक कराड याची पोलखोल करत आहेत, अनेक गौप्यस्फोट करत आहेत.
त्यांनी अगदी पुराव्यानिशी वाल्मीक कराडची आर्थिक बाजू आणि त्याच्या मालमत्तांचा जाहीर पंचनामा केला असल्यामुळे हा ‘बीडचा बाहुबली’ आणि त्याचे साम्राज्य पुढे आले आहे. वाल्मीक कराडच्या सर्व कथा आता ‘अरेबियन नाईट्स’ प्रमाणे चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत, अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. वाल्मीक कराडच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे दूरवर पसरली असून सर्व आकडेवारी अचंबित आणि आश्चर्यचकित करणारी आहे.
सुरेश धस यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे सर्वत्र सनसनाटी पसरली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. वाल्मीक कराडचा उल्लेख आका असा केला जात असून त्याचे आणि त्याच्या आकाचे उद्योग परळीत ऐन जोमात सुरू असल्याचे धस यांचे म्हणणे आहे. त्यांनी यांचे मोठे कनेक्शन काढले असून पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर सात मोठे दुकान गाळे आहेत. त्याच्या चालकाच्या नावावर तब्बल १५ कोटीचा एका भव्य इमारतीचा पूर्ण मजला असल्याचा गंभीर आरोप धस यांनी केला आहे. यातील प्रत्येक दुकानाची किंमत पाच कोटीच्या वर आहे आणि आठवे दुकान हे एका आरोपीच्या बहिणीच्या नावावर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वाल्मीक कराड याचे दुसरे लग्न झाले असून त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर तीन दुकाने आहेत. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका इमारतीचा 15 कोटींचा एकच संपूर्ण मजला त्याने खरेदी केला आहे. हा मजला त्याच्या चालकाच्या नावावर आहे असा आरोप करून धस यांनी पुरावे सादर केले आहेत.
परळीमध्ये रिव्हॉल्वर विक्री, चरसचा व्यवसाय
परळी गावात इराणी समाजाचे बरेच लोक राहतात. या दोघांच्या जीवावर ते गांजा चरस आणि देशी विदेशी रिव्हॉल्वरची विक्री करतात. या इराणी लोकांकडून वाल्मीकी आणि त्याच्या साथीदार ना मोठा हिस्सा मिळतो. त्या वसुलीसाठी विशेष पोलिसांची नियुक्ती होते असा गंभीर आरोप धोस यांनी केला आहे
परळीमध्ये असलेल्या थर्मल प्लांट मधील भंगार दररोज चोरीला जाते आणि पोलिसांच्या साक्षीने त्याची विक्री होते, पोलिसांचा वाटा दिला जातो आणि उर्वरित रक्कम आक्का हडप करतो असा दावाही धस यांनी केला आहे.
वाल्मीक कराड याची आणखी काही गुपिते या अनुषंगाने बाहेर पडली आहेत. शंभर कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणाऱ्या कराडच्या मागे २०२२ पासून ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावेळी त्याला ईडीची पहिली नोटीस आली होती, त्यावेळीस त्याची मालमत्ता 100 कोटी पेक्षा जास्त होती.
अनेकांच्या जमिनी हडप
वाल्मीक कराड ने जबरदस्तीने अनेक गोरगरिबांच्या जमिनी हडप केल्याचे ही पुढे आलेले आहे. त्याची संपूर्ण यादीच दूरदर्शन वरून सादर करण्यात आली आहे. आता या संशयाच्या मुद्द्यांवरून वाल्मीक कराड भोवती असलेले जाळे आणखी आवळले जाणार असून त्याचा फटका धनंजय मुंडे यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचेल, असे समजण्यास सध्या तरी हरकत नाही.
चौकशीमध्ये चांगलीच प्रगती
देशमुख खून प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाजले असून गृहखात्याचे आणि सरकारचे त्यावर अगदी बारीक लक्ष आहे. आतापर्यंत जे जे आरोपी पकडले गेले आहेत त्यांची वेगवेगळ्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू आहे. अनेकांचे मोबाईलही ताब्यात घेतले गेले असून त्यावरील संभाषणाच्या आधारे फासे टाकले जात आहेत.
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे या जोडीची बीड जिल्ह्यामध्ये किती ताकद आहे हे सुरेश धस वारंवार सांगत असले तरी कराड हा एकेकाळी धस यांचाच सहकारी होता. त्यामुळे विरोधकांकडून धस यांच्यावर आरोप होणे आता साहजिकच सुरू झाले आहे. त्यामध्ये धस यांची दादागिरी, तेथील बँका बुडवणे, गोरगरिबांना वेठीस धरून त्यांचे शोषण करणे, यासारखे गुन्हे पुढे येऊ लागले आहेत.
एकूणच बीड जिल्ह्याचे दहशतवादाचे विदारक चित्र पुढे येऊ लागले असले तरी याला तेथील ओबीसी आणि मराठा यांच्यात असलेल्या संघर्षाचे स्वरूप देण्यात येणे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. परळी मध्ये जे काही व्हायचे आहे ते सर्व धर्मांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरावे, आणि तेथील दहशत संपून गोरगरिबांना समाधानाचे आणि सुखाचे दोन घास खायला मिळावेत, एवढीच आता अपेक्षा !